विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट; महायुतीचे निर्विवाद वर्चस्व, महाविकास आघाडीचा धुव्वा

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाल्याचे सोमवारच्या निकालाने स्पष्ट झाले.
विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट; महायुतीचे निर्विवाद वर्चस्व, महाविकास आघाडीचा धुव्वा
विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट; महायुतीचे निर्विवाद वर्चस्व, महाविकास आघाडीचा धुव्वा
Published on

मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाल्याचे सोमवारच्या निकालाने स्पष्ट झाले. क्रॉस वोटिंगमुळे महायुतीच्या विजयी उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. काही मतदारांसघात महायुतीची मते फोडण्यात आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले, तरी ही मते आघाडीच्या उमेदवारांना विजयी करू शकली नाहीत. या निवडणुकीत महायुतीने ११ पैकी १० जागा जिंकून निर्विवाद यश मिळवले, तर अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यात नागपूरच्या पोटनिवडणुकीचा समावेश होता. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित ११ जागांसाठी १८ जूनला मतदान होऊन त्याचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. या निकालात अनेक ठिकाणी मतदारांनी पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा निभाव लागू शकला नसला तरी आघाडीच्या उमेदवारांनी परभणी-हिंगोली, सांगली-सातारा मतदारसंघात महायुतीची मते खेचण्यात यश मिळवले. मात्र, अमरावतीत काँग्रेस उमेदवाराला एकही मत मिळू शकले नाही.

विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार

  • भाजप : बसवराज पाटील (उस्मानाबाद-लातूर-बीड), नंदकिशोर महाजन (जळगाव), प्रवीण पोटे-पाटील (अमरावती), अविनाश ब्राम्हणकर (भंडारा-गोंदिया), अमर राजूरकर (नांदेड), सुहास शिरसाट (औरंगाबाद-जालना ), धैर्यशील कदम (सांगली -सातारा), राजेंद्र राऊत (सोलापूर), डॉ. राजीव पोतदार (नागपूर)

  • शिवसेना शिंदे गट : सईद खान (परभणी-हिंगोली)

  • अपक्ष : गोकुळ गीते (नाशिक)

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

  • भाजप : प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), अरुण लखानी (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)

  • शिवसेना शिंदे गट : रवींद्र फाटक (ठाणे), दुष्यन्त चतुर्वेदी (यवतमाळ)

  • राष्ट्रवादी अजित पवार : अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ),

  • विक्रम काकडे (पुणे)

नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाला भाजपचा दगाफटका

शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपच्या बंडखोर उमेदवाराकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत भाजपच्या मतदारांनी बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्या पारड्यात मते टाकली. याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटानेही गीते यांना मदत केली. त्यामुळे शिंदे गटाच्या किशोर दराडे यांचा पराभव झाला. या पराभवामुळे नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे गटातील तणाव वाढला आहे. शिंदे गटाने नाशिकच्या पराभवाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in