विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान

शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्या आणि गावी गेलेले शिक्षक मतदार या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाची १० जून रोजी जाहीर करण्यात आलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही निवडणूक २६ जून रोजी होणार आहे.
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान

प्रतिनिधी/मुंबई : शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्या आणि गावी गेलेले शिक्षक मतदार या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाची १० जून रोजी जाहीर करण्यात आलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही निवडणूक २६ जून रोजी होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी विधान परिषद निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार विधान परिषदेच्या चार जागांची मतमोजणी १ जुलै रोजी होणार आहे. विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत येत्या ७ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होत असलेल्या या चार जागांसाठी निवडणूक होत आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान विविध टप्प्यात सुरू असतानाच निवडणूक आयोगाने ८ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली होती. निवडणूक आयोगाने आधी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार या चार मतदारसंघात १० जून रोजी मतदान होऊन १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या आणि सुट्टीनिमित्त गावी गेलेले शिक्षक मतदार यामुळे विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने १४ मे रोजी विधान परिषदेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.

आता जाहीर झालेल्या नव्या कार्यक्रमानुसार विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना ३१ मे रोजी जारी केली जाईल. ७ जून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. १० जूनला उमेदवारी अर्जांची छाननी तर १२ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २६ जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल. तर १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी हाती घेऊन निवडणूक निकाल घोषित करण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in