राज्यातील पाच मतदारसंघात गडकरी, मुनगंटीवार, नेते, मेंढे, पारवे यांची कसोटी

नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत.
राज्यातील पाच मतदारसंघात गडकरी, मुनगंटीवार, नेते, मेंढे, पारवे यांची कसोटी

नागपूर : अठराव्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी होणार आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा- गोंदिया, चिमूर- गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होत असल्यामुळे बुधवारी संध्याकाळी पाच वाजता या मतदारसंघांतील प्रचार थंडावला.

नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. तर चंद्रपूरमध्ये राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे उमेदवार असून त्यांची लढत कॉंग्रेसचे माजी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्याशी होणार आहे. रामटेकमध्ये काँग्रेसमधून आयात केलेले राजू पारवे हे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार म्हणून रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसने श्याम बर्वे यांना उमेदवारी दिली आहे. येथे काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्यामुळे तिरंगी सामना होणार असे चित्र आहे.

भंडारा-गोंदियामध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेसने डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या दोघांनीही आपापल्या उमेदवारांसाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. गडचिरोली- चिमूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते हे पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरपान हे रिंगणात आहेत.

बुधवारी शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रामटेक लोकसभा क्षेत्रात मोटरसायकलने फिरून प्रचार केला. दरम्यान, या पाचही लोकसभा क्षेत्रात मतदान सुरळीत पार पडावे म्हणून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in