शतायुषी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; ११३ वर्षांची महिला, १०३ वर्षांचे स्वातंत्र्यसेनानी यांनी केले मतदान

Maharashtra assembly elections 2024: विधानसभा निवडणुकीत राज्यातील विविध भागातील अनेक शतायुषी मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदानात भाग घेतला. मुंबईतील नेपियनसी मार्ग येथील रहिवासी असलेल्या ११३ वर्षीय कांचनबेन नंदकिशोर बादशाह, तसेच ग्रँट रोड येथील रहिवासी असलेले १०३ वर्षीय जी. जी. पारेख यांनी मलबार हिल केंद्रावर मतदान केले.
शतायुषी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; ११३ वर्षांची महिला, १०३ वर्षांचे स्वातंत्र्यसेनानी यांनी केले मतदान
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यातील विविध भागातील अनेक शतायुषी मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदानात भाग घेतला. मुंबईतील नेपियनसी मार्ग येथील रहिवासी असलेल्या ११३ वर्षीय कांचनबेन नंदकिशोर बादशाह, तसेच ग्रँट रोड येथील रहिवासी असलेले १०३ वर्षीय जी. जी. पारेख यांनी मलबार हिल केंद्रावर मतदान केले. मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी असलेल्या १११ वर्षीय फुलमती बिनोद सरकार यांनी मतदान केले.

मतदानाचे कर्तव्य पार पाडताना वयाचा अडसर येता कामा नये, जणू काही हेच सिद्ध करीत वयाची शंभरी ओलांडलेल्या नागरिकांनी मतदानात भाग घेतला. त्यांनी सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर स्वत:च्या मोटारीतून, रिक्षातून, तर काहींनी व्हील चेअरवरून मतदान केंद्रांवर येण्यास सुरुवात केली. यावेळी निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. तरी देखील शंभरी ओलांडलेल्या अनेक मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्यास पसंती दिली. नेपियनसी रोड येथील ११३ वयाच्या रहिवासी कांचनबेन बादशाह यांनी आपल्या कुटुंबीयांसह मलबाल हिल केंद्रावर मतदान केले. ग्रँट रोड येथील १०३ वर्षे वय असलेले जी. जी. पारेख यांनी गिरटन हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

लातूर शहरातील १०१ वयाच्या नर्मदाबाई मदनलाल तोश्निवाल यांनीही प्रत्यक्ष मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. नर्मदाबाई यांनी सोलापूर गल्ली येथील वेंकटेश प्रायमरी स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

१११ वर्षांच्या आजीचे स्वागत

लोकशाहीच्या उत्सवात थोडं थोडके नव्हे तर तब्बल १११ वर्षे वय असलेल्या आजीने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. फुलमती बिनोद सरकार असे या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. मतदान करताना त्यांनी आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यानंतर शालेय विद्यार्थी, गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती बिनोद सरकार यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत त्यांचे यावेळी स्वागत केले. यावेळी या आजीने प्रत्यक्ष मतदार केंद्रावर जाऊन मतदान केल्याचे पाहूल अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

logo
marathi.freepressjournal.in