विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे.
विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान
Published on

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीने या चार जागांसाठी जोर लावला आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत हे मतदान होईल. या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैला होऊन निकाल जाहीर केले जातील.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाने मतदान होते. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी महायुतीने मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत, तर महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला आहे.

मुंबई पदवीधरमध्ये थेट लढत

मुंबई पदवीधरमध्ये एकूण आठ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात होणार आहे. मुंबईतील १ लाख २० हजार ६७३ मतदार अनिल परब आणि किरण शेलार यांचे भवितव्य निश्चित करतील.

कोकण मतदारसंघात थेट लढत

कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात सरळ लढत होत आहे. निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील भाजपची यंत्रणा लक्षात घेता काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी नाही. या मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदारांची नोंद झाली आहे.

नाशिक मतदारसंघात तिरंगी लढत

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून एकूण २१ उमेदवार विधान परिषद निवडणुकीसाठी आपले नशीब आजमावत आहेत. तथापि, मुख्य लढत ही शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, उद्धव ठाकरे गटाचे संदीप गोपाळराव गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात आहे. विशेष म्हणजे येथे सत्ताधारी महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे उमेदवार आमनेसामने उभे आहेत. विशेष म्हणजे येथे भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात ६९ हजारांहून अधिक मतदार आहेत.

मुंबई शिक्षकमध्ये पंचरंगी लढत

मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापैकी उद्धव ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराडे आणि शिवसेना शिंदे गटपुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे हे पाच प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघात एकूण १५ हजार ८३९ मतदार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in