

मुंबई : महाराष्ट्रात जंगलात सोडण्यात आलेल्या पुनर्वसनित भारतीय गिधाडाने अवघ्या ५६ दिवसांत तब्बल १,६१८ किलोमीटरहून अधिक अंतर पार करत वन्य जीवनाशी यशस्वी जुळवून घेतल्याचे समोर आले आहे. ही गिधाड संवर्धन कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आशादायी कामगिरी असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांनी रविवारी सांगितले.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, जे १३२ या क्रमांकाचे गिधाड ७ जून रोजी नाशिक येथे तिसऱ्यांदा जंगलात सोडण्यात आले. यापूर्वी दोन वेळा जंगलात सोडल्यानंतर त्याची शारीरिक क्षमता आणि जगण्याची शक्यता वाढवण्यासाठी संशोधकांनी त्याला पुन्हा पकडले होते.
गेल्या आठ आठवड्यांत या गिधाडाने सातत्याने उड्डाण करत १७ जून रोजी एका दिवसात सर्वाधिक १६८ किलोमीटरचे अंतर पार केले. उपग्रहाद्वारे करण्यात आलेल्या निरीक्षणात त्याने दररोज नियमितपणे उड्डाण केल्याचे दिसून आले.
बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले की, डोल ओहोळ आणि देवडोंगरा परिसरात हे गिधाड अनेक रानटी गिधाडांच्या कळपात यशस्वीरित्या मिसळल्याचे प्रत्यक्ष निरीक्षणात आढळले.
ते म्हणाले, "मुसळधार पावसाच्या काळातही हे गिधाड स्वतःहून जनावरांचे मृतदेह शोधून इतर रानटी गिधाडांसोबत त्यावर उपजीविका करताना दिसले. यावरून त्याने वन्य जीवनाशी पूर्णपणे जुळवून घेतल्याचे स्पष्ट होते." हे गिधाड प्रथम ११ डिसेंबर २०२५ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पात वाढविण्यात आलेल्या भारतीय गिधाडांच्या दुसऱ्या तुकडीसोबत जंगलात सोडण्यात आले होते.
त्यावेळी ते अवघ्या २० दिवसांत ७५० किलोमीटरहून अधिक प्रवास करून नाशिकपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी संशोधकांनी त्याला पुन्हा पकडले.
नाशिकचे डोंगर
बीएनएचएसचे संशोधक मानसिंह महादेव, जे या गिधाडावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत, यांनी सांगितले की उत्तर नाशिकमधील खडकाळ डोंगररांगा आणि अनुकूल अधिवास हे गंभीर संकटग्रस्त गिप्स प्रजातीच्या गिधाडांसाठी महत्त्वाचे आश्रयस्थान ठरत आहेत. जे १३२चे पुनर्वसन होणे हा भारतातील गंभीर संकटग्रस्त गिधाडांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.