वडेट्टीवार-धानोरकर वाद दिल्लीदरबारी, वरिष्ठ नेत्यांकडून दखल

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला वाद आता थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
वडेट्टीवार-धानोरकर वाद दिल्लीदरबारी, वरिष्ठ नेत्यांकडून दखल
Faceb
Published on

नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला वाद आता थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार आणि प्रतिभा धनोरकर यांना शनिवारी दिल्लीत बोलावून घेतले. या दोन्ही नेत्यांमधील वाद शमविण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे या बैठकीला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आल्यामुळे तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वडेट्टीवार-प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादाचा फटका विधानसभा निवडणुकीत काँगेस पक्षाला बसू नये याची खबरदारी घेण्याचे प्रयत्न पक्षाने सुरू केले आहेत.

लोकसभा उमेदवारीवरून या वादाला तोंड फुटले होते. काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून धानोरकर यांना तिकीट दिले. वास्तवात, आपल्या मुलीला या जागेवर तिकीट मिळावे यासाठी वडेट्टीवार आग्रही होते, पण त्यांना यश आले नाही. त्यानंतर वडेट्टीवारांनी निवडणुकीदरम्यान चंद्रपूरकडे पाठ फिरवली होती. धानोरकर यांनीही वडेट्टीवार यांच्यावर वेळोवेळी नाव न घेता टीका केली होती. पक्षातील काही नेत्यांच्या त्रासामुळे माझ्या पतीला जीव गमवावा लागला, असा आरोप धनोरकर यांनी केला होता.

बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील घडामोडींची कल्पना आपण वरिष्ठांना दिली असल्याचे सांगितले. २३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याची बैठक असून त्यात मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, चंद्रपूर मतदारसंघातील विधानसभा उमेदवारांची तिकिटे आपणच निश्चित करणार असल्याचा दावा धानोरकर यांनी केला होता. याबद्दल वडेट्टीवार यांना विचारले असता, बैठकीत त्याबद्दल काहीही चर्चा करण्यात आली नाही. गैरसमजातून काही वाद निर्माण झाले होते परंतु त्यावर आता आम्ही पडदा टाकला आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in