वरळी ‘हिट अँड रन’प्रकरणी वॉण्टेड मिहीर शहाला अटक; चालक राजऋषी बिदावतच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

वरळी ‘हिट अँड रन’ गुन्ह्यातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहाला अखेर ७२ तासांनंतर अटक करण्यात वरळी पोलिसांना यश आले आहे. विरार येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी वरळी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
वरळी ‘हिट अँड रन’प्रकरणी वॉण्टेड मिहीर शहाला अटक; चालक राजऋषी बिदावतच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

मुंबई : वरळी ‘हिट अँड रन’ गुन्ह्यातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहाला अखेर ७२ तासांनंतर अटक करण्यात वरळी पोलिसांना यश आले आहे. विरार येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी वरळी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बुधवारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, याच गुन्ह्यातील आरोपी कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत याच्या पोलीस कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

रविवारी वरळी येथे मिहीर चालवत असलेल्या बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला जोरात धडक दिली होती. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती प्रदीप लीलाधर नाखवा हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर मिहीर हा त्याचा कारचालक राजऋषी बिदावत याच्यासह पळून गेला होता. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात मद्यप्राशन करून हलगर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस, तर तिच्या पतीला दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच मिहीरचे वडील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे उपनेते राजेश दामजी शहा यांच्यासह त्यांचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांनाही सोमवारी शिवडीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी राजेश शहा यांची १५ हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली, तर राजऋषीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला मंगळवारी पुन्हा शिवडीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची (११ जुलै) वाढ केली आहे.

दुसरीकडे या ‘हिट अँड रन’ गुन्ह्यातील मुख्य आरोपी मिहीर शहा हा अपघातानंतर पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली होती. त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या सोळा पथकांची नियुक्ती करून शोध सुरू होता. ही शोधमोहीम सुरू असताना विरार फाटा परिसरातून मंगळवारी मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वरळी पोलीस ठाण्यात पुढील चौकशीसाठी आणण्यात आले.

‘बीस ग्लोबल’ बारला नोटीस

दरम्यान, वरळीतील ‘हिट अँड रन’प्रकरणी जुहूच्या ‘बीस ग्लोबल’ या बारवर एक्साइज विभागाने कारवाई केली आहे. बारच्या मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत बारमध्ये मद्याची खरेदी-विक्री करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. याच बारमध्ये मिहीरने त्याच्या चार मित्रांसोबत पार्टी केली होती. त्याचे बिल अठरा हजार रुपये झाले होते. ते बिल त्याने सोशल मीडियावर अपलोड केले होते. मद्यप्राशन करून त्याने कार चालवून वरळी येथे एका महिलेला धडक दिली व त्यात तिचा मृत्यू झाला ही बाब तपासात उघडकीस येताच वरळी पोलिसांनी ‘बीस ग्लोबल’ बारमध्ये तपासणी केली होती. पोलिसांनी बारचे सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये मिहीर हा मद्यप्राशन करून बारमधून जात असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी राज्य एक्साइज विभागाने या बारमध्ये जाऊन तपासणी केली. त्यात बारचे काही बांधकाम नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बारच्या मालकाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. त्याची जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार असून ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत बारमध्ये दारू खरेदी-विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in