तडस आणि काळे आमनेसामने; वर्धा लोकसभा मतदारसंघ

वर्धा लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून सध्या २४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अर्थात प्रमुख लढत ही भारतीय जनता पक्षाचे रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यातच होणार असे चित्र दिसते आहे.
तडस आणि काळे आमनेसामने; वर्धा लोकसभा मतदारसंघ
Published on

अविनाश पाठक

नागपूर : वर्धा लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून सध्या २४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अर्थात प्रमुख लढत ही भारतीय जनता पक्षाचे रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यातच होणार असे चित्र दिसते आहे. नाही म्हणायला वंचित बहुजन आघाडीचे डॉ. राजेश साळुंखे आणि बसपाचे मोहन राइकवार हे दोघे रिंगणात उतरले आहेत. मात्र हे दोघे कुणाची किती मते खाणार इतकेच त्यांचे अस्तित्व आज तरी जाणवते आहे.

वर्धा मतदारसंघ हा सुरुवातीला काँग्रेसचाच बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. सुमारे दहा वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेले वसंतराव साठे हे याच मतदारसंघातून विजयी होत होते. राज्यपाल राहिलेल्या प्रभा राव, शरद पवारांचे एकेकाळचे निकटवर्ती दत्ता मेघे असे अनेक दिग्गज या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

यापूर्वी २०१९ पर्यंत हा मतदारसंघ महाआघाडीत काँग्रेसकडे असायचा. महायुतीत मात्र तो सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाकडे आहे. २०१४ पासून इथून भाजपचे रामदास तडस विजयी होत आहेत. रामदास तडस हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. दत्ता मेघे यांचे ते निकटवर्ती, मात्र नंतर ते भाजपमध्ये आले. त्यांच्या पाठोपाठ आता दत्ता मेघेही भाजपमध्ये आलेले आहेत. तेली समाजाचे नेते असलेले रामदास तडस हे चांगले कुस्तीपटूही आहेत. महाराष्ट्र कुस्तीपटू परिषदेत त्यांनी शरद पवारांचा पराभव करून ते अध्यक्ष बनले होते. मात्र यावेळी त्यांना धोबीपछाड देण्याच्या प्रयत्नासाठी शरद पवारांनी हा मतदारसंघ महाआघाडीत काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेतला.

आर्वी मतदारसंघातून पूर्वी शरद काळे हे आमदार म्हणून निवडून जात होते. शरद काळेंच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र अमर काळे हे देखील इथून आमदार होते. मात्र २०१९ मध्ये त्यांचा आर्वी मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. मधल्या काळात शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओढले आणि त्यांना तडसांविरुद्ध उमेदवारी दिली आहे.

या मतदारसंघातील सहा क्षेत्रांपैकी चार क्षेत्रांमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर एका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे भाजपचे वर्चस्व चांगले आहे. असे असले तरी तडस यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या सुनबाई पूजा तडस यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रामदास तडस व अमर काळे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काळे यांच्या अर्ज दाखल करतेवेळी दस्तुरखुद्द शरद पवार उपस्थित होते. तर तडस यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही उपस्थित होते. येथे अजूनपर्यंत तरी दिग्गजांच्या सभा झाल्या नसल्या तरी १८-१९ तारखेनंतर या सभा सुरू होतील, असे बोलले जात आहे. १९ एप्रिलला पंतप्रधानांची सभा होण्याचीही शक्यता आहे. रामदास तडस यांच्यासाठी जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार आणि कार्यकर्ते कंबर कसून तयारीला लागले आहेत. याशिवाय फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे हे देखील आर्वीत तळ ठोकून असल्याची माहिती आहे. अमर काळे यांच्यासाठी माजी गृहमंत्री शंभर कोटी फेम अनिल देशमुख हे वर्धा जिल्ह्यातच तळ ठोकून आहेत. एकूणच दोन्ही बाजूंनी विजयासाठी कंबरा कसल्या आहेत. रामदास तडस हे यापूर्वीही दोनदा खासदार राहिलेले आहेत. त्याआधी ते आमदारही होते. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात जनसंपर्क चांगला आहे. तेली समाजाचेही ते नेते आहेत. अमर काळे हे तरुण आहेत त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. वंचितचे राजेश साळुंखे आणि बसपाचे मोहन राइकवार हे कोणाची किती मते खातात त्यावरून या मतदारसंघाचा खासदार कोण हे ठरणार आहे.

असा आहे मतदारसंघ

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सर्वोदयवादी नेते विनोबा भावे यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वर्धा जिल्ह्यातील वर्धा, अरबी देवळी आणि हिंगणघाट हे चार विधानसभा क्षेत्र आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि मोर्शी हे दोन विधानसभा क्षेत्र अशा सहा क्षेत्रांचा मिळून वर्धा लोकसभा मतदारसंघ गठित झालेला आहे. आजमितीला या मतदारसंघात जवळजवळ १७ लाख मतदार आहेत. इथे तेली आणि कुणबी समाजाचे वर्चस्व जास्त आहे.

तडस दाम्पत्याच्या बेबनावावरही राजकारण

पूजा तडस आणि त्यांचे पती पंकज तडस यांच्या लग्नानंतर काहीच दिवसांत त्या दोघांमध्ये बेबनाव होऊन ते दोघेही विभक्त झाले आहेत. त्यांच्यातल्या बेबनावाला २०२१-२२ मध्ये माध्यमांनी जाहीर स्वरूप देण्याचाही प्रयत्न केला होता. आपला अर्ज दाखल केल्यावर पूजा तडस यांनी आपले पती आणि सासरे यांच्या विरोधात पत्र परिषद घेऊन त्यांनी आपल्यावर कौटुंबिक अत्याचार कसा केला याची कर्म कहाणी माध्यमांसमोर उघड केली आहे. त्यांच्या या प्रयत्नात शिवसेना ठाकरे गटाच्या एक महिला नेत्या सुषमा अंधारे यांनीही हातभार लावला आहे. एकूणच रामदास तडस यांचे निवडणुकीतील वातावरण खराब कसे करता येईल हा यांचा प्रयत्न दिसतो आहे. अर्थात डॅमेज कंट्रोलला तडस यांनीही सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in