मुंबई : पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली असून, हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे सरकारने म्हटले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारामुळे वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
पंढरपूरच्या आषाढी वारीत यावर्षी १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना रुग्णसेवा देण्यात आली. यामध्ये १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. जगातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दलची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने केली आहे. या महाआरोग्य शिबिरात १५ लाख १२ हजार ७७४ लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आणि त्यासाठी ७,५०० डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमामुळे पंढरपूरच्या वारीला एक नवी ओळख मिळाली. यामुळे अनेक वारकऱ्यांचे जीव वाचले आणि लाखो वारकऱ्यांना तात्काळ उपचार मिळाले. वारी दरम्यान आणि पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिरात वेळेवर आणि सहज, दर्जेदार उपचार मिळाल्यामुळे वारकऱ्यांनी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांचे मनापासून आभार मानले आहेत.
`आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. वारकरी, भाविकांमध्ये आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने उपक्रम राबविण्यात आले. यात आरोग्य दिंडी, चित्ररथ, आरोग्य दूत, संदेश टोपी, आरोग्य प्रदर्शनी, बॅनर/स्टिकर, आरोग्य संदेश ऑडिओ व्हिडिओ, समाज माध्यमे, आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे संदेश प्रसारण, वृत्तपत्र जाहिरात, क्यूआर कोडचे वाटप, आरोग्य ज्ञानेश्वरी यांचा समावेश आहे.
अशी उपलब्ध झाली आरोग्य सुविधा
पालखी सोहळा २०२४ साठी एकूण मनुष्यबळ - ६,३६८
प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ – २५८
वारी दरम्यान अहोरात्र १०२ व १०८ रुग्णवाहिका – ७०७
दिंडी प्रमुखांसाठी औषधांचे कीट – ५,८८५
महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ – १३६
पालखी ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना – १३६
पालखी मार्गावर आरोग्य दूत – २१२
पालखीसोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ९
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष - ८७