पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा ; 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूच्या घाटपरिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा ; 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
Published on

सध्या राज्यासह देशात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळणे, रस्ते खचणे, असे प्रकार घडत आहेत. यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली. आता संपूर्ण किनारपट्टीसह, घाटमाथा, विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि मराठवाड्यातील लातूर, नांदेड जिल्ह्यांना पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकले आहे. पुढील २४ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर हे क्षेत्र पश्चिम बंगाच्या दिशेने रवाना होईल. तसंच पुढील २४ तासांत कोकण, गोव्यात पावसाचा जोर वाढणार आहे. प्रामुख्याने रायगड आणि रत्नागिरीसह घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूच्या घाटपरिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील नांदेड, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागांतही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारासह घाटमाथा या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in