

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. एका व्यक्तीने प्रथम पत्नी आणि दोन मुलांना विहिरीत ढकलून दिले व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, मृत महिलेच्या भावाने या घटनेबाबत संशय व्यक्त केला असून, हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील तिवळी गावात घडलेल्या या घटनेत, संतोष तुकाराम बकाल (३५) यांनी आपली पत्नी तसेच मुलगी जान्हवी (७) आणि मुलगा सोहम (5) यांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चौघांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय
या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, मृत महिलेच्या भावाने हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. सध्या शिरपूर पोलिस या प्रकरणाची आत्महत्या आणि हत्या अशा दोन्ही अंगांनी सखोल चौकशी करत असून, एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमुळे तिवळी गावासह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.