पुणे जिल्ह्यातील तालुक्यांचा पाणीप्रश्न सुटणार; पुढील ५० वर्षे पिण्याच्या पाण्याचे नियोजन, अजित पवार यांचे संबंधित विभागाला निर्देश

पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, बारामती, इंदापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा.
पुणे जिल्ह्यातील तालुक्यांचा पाणीप्रश्न सुटणार;  पुढील ५० वर्षे पिण्याच्या पाण्याचे नियोजन, अजित पवार यांचे संबंधित विभागाला निर्देश
Published on

मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली, आंबेगाव, बारामती, इंदापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देत या गावातील पुढील ५० वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता भौगोलिक परिस्थिती व जलस्रोताचा अभ्यास करत पर्याय सूचवा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट द्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. नवीन प्रस्ताव तयार करताना धरणातून बंद पाइपद्वारे पाणी आणणे किंवा नवीन साठवण तलाव बांधणे यासारख्या पर्यायांचाही विचार करावा. सध्याच्या अस्तित्वातील साठवण तलावाची दुरुस्ती, अशुद्ध पाणी गुरुत्वनलिका, अशुद्ध पाणी उद्धरणनलिका, पंपिंग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र, अस्तित्वातील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती, शुद्ध पाणी ऊर्ध्वनलिका, उंच जलकुंभ, संतुलन टाकी, वितरण व्यवस्था, सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक स्त्रोतांचा वापर, तसेच इतर अनुषंगिक कामांचा नव्या योजनेत समावेश करून, अंदाजपत्रकासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा.

या प्रस्तावाचा शासनस्तरावर अभ्यास करून त्यास तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. जिल्ह्यातील गावांच्या पाणी योजनांचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीला नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

नव्या, पक्क्या साठवण तलावांना मंजुरी

बारामती तालुक्यातील मौजे कांबळेश्वर येथील मातीच्या साठवण तलावातून कांबळेश्वर - शिरवली-शिरष्णे-लाटे-माळेवाडी या पाच गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या साठवण तलावाचे बांधकाम जीर्ण झाले असल्याने मोठ्या प्रमाणावर गळती होते. या साठवण तलावाचे बांधकाम नव्याने आणि पक्क्या स्वरूपात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही पवार यांनी दिले.

चार गावांच्या नळ योजनांना मान्यता

अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील मौजे-भावडी आणि टाकळी- लोणार या दोन गावांतील, अकोले तालुक्यातील मौजे-माळेगाव आणि कर्जत तालुक्यातील शिंपोरा या गावातील जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in