राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा २३ टक्क्यांवर; संभाजीनगर, पुण्यातील परिस्थिती चिंताजनक

राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या मतदानाची धामधूम शमल्यानंतर आता दुष्काळी परिस्थितीचे भीषण वास्तव जाणवू लागले आहेत.
राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा २३ टक्क्यांवर; संभाजीनगर, पुण्यातील परिस्थिती चिंताजनक
Published on

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या मतदानाची धामधूम शमल्यानंतर आता दुष्काळी परिस्थितीचे भीषण वास्तव जाणवू लागले आहेत. जलसंपदा विभागातर्फे शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा अवघ्या २३.६३ टक्क्यांवर आला आहे. राज्यातील २ हजार ९७३ गावे, ७ हजार ६७१ वाड्यांना शासकीय आणि खासगी मिळून ३ हजार ६९२ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे.

छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील धरणांमधील पाणीसाठा अनुक्रमे ९.५५ टक्के आणि १७.५९ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये ३३.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ९ टक्क्यांनी कमी आहे. राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे शुक्रवारी प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यातून महाराष्ट्रातील पाणीटंचाईची भीषणता समोर आली आहे. सर्वात कमी पाणीसाठा हा छत्रपती संभाजीनगर येथे नोंदविण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील एकूण ९२० धरणांमध्ये केवळ ९.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे यावेळी समोर आले आहे. या धरणांमध्ये केवळ ६९३.३७ द.ल.घ.मी पाणीसाठा उपयुक्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पुण्यातील एकूण ७२० धरणांमध्ये १७.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर नाशिक येथील ५३७ धरणांमध्ये २५.७४ टक्के पाणीसाठा, तर कोकणातील १७३ धरणांमध्ये ३७.११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नागपूर येथे ३८३ धरणांमध्ये ३८.८३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून अमरावतीमधील २६१ धरणांमध्ये ३९.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत - शरद पवार

राज्यामध्ये पावसाची स्थिती गंभीर आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांतील ४० तालुके गंभीर दुष्काळग्रस्त आहेत, तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ १६ तालुक्यांत आहे एकंदरीत विचार केला तर ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान होऊनही राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष नसल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोडले आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, एकंदरीत ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असून, ही परिस्थिती महाराष्ट्रात जून अखेरपर्यंत राहिल्यास राज्यात दुष्काळाची परिस्थिती अधिकच भीषण होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात भीषण दुष्काळ आहे त्या ठिकाणी मागणीपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याने लोकांची वणवण होत आहे. महाराष्ट्रात एकंदर २ हजार ९२ मंडळ आहेत, यातील पंधराशे मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यातील मराठवाड्यामध्ये आणि पुण्यातील काही भागात गंभीर परिस्थिती आहे. देशभरात सर्वाधिक धरणे महाराष्ट्र राज्यात आहेत, परंतु पाणीसाठ्याचा विचार केला तर सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही शरद पवार म्हणाले. मराठवाड्यात ४० महत्वाची धरणे आहेत. परंतु, या विभागात फक्त १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या विभागासह अशीच परिस्थिती अनेक जिल्ह्यांची आहे. छत्रपती संभाजीनगरला ८१ लघु प्रकल्प आहेत, इथे फक्त सहा टक्के पाणी शिल्लक आहे. पुण्यामध्ये पन्नास प्रकल्प आहेत, या भागात फक्त २४ टक्के पाणी शिल्लक असल्याचे पवार म्हणाले.

मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये फारच कमी जलसाठा शिल्लक आहे, तर अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या मोठ्या प्रकल्पामध्ये पाच टक्क्यांहून खाली पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कृषीमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु कृषीमंत्रीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दुष्काळाच्या कालच्या बैठकीला हजर नसतील तर ही गंभीर बाब आहे. सरकारमधील फक्त दोनच पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे, असे शरद पवार म्हणाले. राज्य सरकारला आम्ही माध्यमांच्यामार्फत जागे करण्याचे आवाहन करत आहोत. हे करूनही सरकारने काही उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला इतर पर्याय आहेत, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

जुलैपर्यंत हीच स्थिती असणार

मे महिन्याच्या शेवटाकडे आपण आहोत, पण जुलैपर्यंत हीच स्थिती असणार आहे. पाऊस पडतो, पण धरणे भरण्यासाठी वेळ लागतो. संभाजीनगरमध्ये १८६७ टँकर लागत आहेत. वेळीच लक्ष दिले नाही तर स्थिती गंभीर होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यामध्ये ६३२ गाव आणि वाड्यामध्ये ७५५ टँकर सध्या लागत आहेत, असेही पवार म्हणाले. राज्यात यंदा १०,५७२ टँकर लागत आहेत, मागील वर्षी १,१०८ टँकर लागत होते. यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. जनावरांच्या चाऱ्याची आवश्यकता आहे. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणे, किंवा रोजगार हमीचे काम काढणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in