भुजबळ, पंकजाताईंना मुख्यमंत्री बनवेन! महादेव जानकर : मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे

आपण आता महायुतीत नाही. आता भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद असल्याने त्यांना आता कोणाची गरज नाही
भुजबळ, पंकजाताईंना मुख्यमंत्री बनवेन! महादेव जानकर : मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे
Published on

मंदार पारकर/मुंबई

ओबीसी समाजाचे आधी काँग्रेसने वाटोळे केले, आता भाजप तेच करत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे, त्यात गैर काहीच नाही. पण, ते आर्थिक निकषांवर दिले जावे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होता कामा नये. छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी उठविलेला आवाज योग्यच आहे. त्यात सामाजिकदृष्ट्या आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. पंकजा मुंडेही त्यांच्या दृष्टीने काम करत आहेत. पण, भुजबळांचे मालक अजितदादा आहेत. पंकजाताईंचाही पक्ष वेगळा आहे. त्यामुळे भुजबळ आणि पंकजाताईंनी रासपमध्ये यावे, त्यांना मी मुख्यमंत्री करेन, अशी स्पष्ट ऑफर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली.

'नवशक्ति' आणि 'फ्री प्रेस जर्नल' दैनिकाच्या कार्यालयाला महादेव जानकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर दिलखुलास संवाद साधला. राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे. त्यातच ओबीसी समाजामध्येही अस्वस्थता आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी २० जानेवारीचा अल्टीमेटम देत मुंबईकडे कूच करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यात दुमत नाही. केवळ २ टक्के मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सधन आहे. ९८ टक्के मराठा समाज गरीबच आहे. त्यांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यास हरकत नाही. मात्र, ते करताना ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झाला नाही पाहिजे. आज ओबीसी समाजातील अनेक छोट्या जाती तर आर्थिक पातळीवर कुठेच नाहीत. रामोशी असतील, मसणजोगी असतील यांना तर कोणी विचारतही नाही.’’

जानकर म्हणाले, धनगर समाजाचा तर कोणीच लोकप्रतिनिधी नसल्याने त्याला राजकीय पातळीवर कोणी वालीच नाही. ओबीसी समाजातील एखाददुसरी व्यक्ती शहरांमध्ये चांगल्या नोकरीत दिसते. अन्यथा नाही. त्यामुळे प्रत्येक जातीचे संख्याबळ जाणून घ्यायचे असेल तर देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल. पण, जातनिहाय जनगणनेचा विषय हा केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे हे भाजपच्या हातात आहे. पण, भाजपचा आणि रा. स्व. संघाचाच जातनिहाय जनगणनेला विरोध असल्याचेही महादेव जानकर म्हणाले.

दोन मतदारसंघांतून लोकसभा लढणार

मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. महाराष्ट्रातील परभणी किंवा माढा या मतदारसंघांपैकी एका ठिकाणाहून, तर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या मतदारसंघातून अशा दोन ठिकाणांवरून आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. थेट उत्तर प्रदेश का निवडला, असा प्रश्न केला असता, उत्तर प्रदेशात रासपने विधानसभेच्या ७० जागा लढविल्या होत्या. त्या जागांवर आम्ही चांगली मते घेतली असल्याचे जानकर म्हणाले. गुजरातमध्येही पक्षाचे २८ नगरसेवक आहेत. बडोदा विधानसभा मतदारसंघात रासपचा उमेदवार केवळ १२०० मतांनी पडला आहे. आमचा पक्ष सर्वसमावेशक आहे. ब्राह्मण, ठाकूर काय अगदी ख्रिश्चन समाजाचेही लोक आमचे पदाधिकारी असल्याचेही महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीचे पारडे जड

आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपप्रणीत रालोआपेक्षा इंडिया आघाडीचे पारडे राज्यात जड वाटत आहे. पण, जर या दोन आघाड्यांपेक्षा एखादा तिसरा फॅक्टर राज्यात उभा राहिला तर मात्र भाजप राज्यात बाजी मारून जाईल, असा माझा होरा असल्याचेही महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.

रासप स्वतंत्र लढणार

आपण आता महायुतीत नाही. आता भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद असल्याने त्यांना आता कोणाची गरज नाही. त्यामुळे रासप स्वतंत्र लढणार असल्याचे जानकर म्हणाले. मात्र, भाजपने जर लोकसभेआधी ऑफर दिली तर असा प्रश्न केला असता, जर-तर वर आतातरी बोलणे योग्य नाही. जेव्हा देतील तेव्हा विचार करू, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in