लातूर : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत धीरज देशमुख यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. त्याचबरोबर त्यांनी आमदार धीरज देशमुख यांच्या भाषणाचेही कौतुक केले. धीरज यांना पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात ऐकले. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या भाषणाला माझा मानाचा मुजरा, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख, रीड लातूरच्या संस्थापक अध्यक्षा दीपशिखा देशमुख, दैवशाला राजमाने यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्राची संस्कृती पुरोगामी विचाराची आहे. परंतु भाजपने महाराष्ट्रातील पक्ष फोडले, घर फोडले. आमचा पक्ष गेला, चिन्ह गेले, नेते गेले, महामंडळे गेली, सगळे गेले. परंतु जनता आमच्यासोबत राहिली आणि लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार जनतेने निवडून दिले.
या सरकारने फक्त घरे फोडली नाहीत तर येथील उद्योग इतर राज्यात पळवून नेले. आमच्या बेरोजगारांच्या ताटातला घास हिसकावण्याचे पाप यांनी केले.”
हे लाडके नव्हे लबाड सरकार- धीरज देशमुख
भाजपने अदृश्य शक्तीच्या माध्यमातून महायुतीचे सरकार जनतेवर लादले आहे. परंतु आमच्यावर आई तुळजाभवानी व महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. महाविकास आघाडीचे सरकार या ठिकाणी निवडून येणार आहे, असा विश्वास आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केला. काँग्रेसने काय केले, असा प्रश्न विरोधक विचारतात. परंतु, १० वर्षांमध्ये राज्य सरकारने व केंद्र सरकारने काय केले, हे सांगा, असा जाब त्यांनी विचारला. महायुती सरकारने फक्त भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला अत्याचार यात महाराष्ट्र एक नंबरवर नेऊन ठेवला आहे. हे लाडके नाही तर लबाड सरकार आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.