शस्त्र परवाना प्रकरणाला नवा ट्विस्ट; 'त्या' बड्या नेत्यांच्या शिफारशींने शस्त्र परवाना - रामदास कदम
मुंबई : पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणात शस्त्र परवाना हा विधी मंडळातील बड्या नेत्यांच्या शिफारशीने देण्यात आल्याचा दावा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. मात्र तो बडा नेता कोण हे नाव घेणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, शस्त्र परवाना हा पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने दिला, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे.
पुण्यातील गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी शस्र परवाना नाकारला होता. मात्र तरी सुद्धा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने सचिन घायवळला शस्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने हा मुद्दा लावून धरला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
योगेश कदम यांच्यावर होणाऱ्या आरोपानंतर शिवसेना नेते रामदास कदम मुलाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. मी गृहराज्यमंत्री होतो, गृहराज्यमंत्र्याला अधिकार असतात. योगेश कदमही आता राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळे मंत्री म्हणून त्याला काही अधिकार आहेत. एखाद्यावर एकही केस नाही, हे समजल्यावर त्यांचे समाधान झाले असेल आणि संबंधित शिक्षक किंवा बिल्डर असेल अथवा न्यायालयाने क्लीनचिट दिलेली व्यक्ती असेल, तर गृहराज्यमंत्री अशा व्यक्तींना शस्रपरवाना देण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे ते म्हणाले.
योगेश कदम त्यांच्या टार्गेटवर!
योगेश कदम यांना मागील २ ते ३ वर्षांपासून सातत्याने टार्गेट केले जात आहे. पण तरीही ते निवडून आले. त्यानंतर त्यांना पुन्हा ४ ते ५ खात्यांचा कारभार मिळाला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांना पोटशुळ उठला आहे. आम्ही त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही त्यांना ऐवढी खाती मिळतात, हे त्यांचे खरे दुखणे आहे, असेही रामदास कदम म्हणाले.