शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका : थेंब थेंब पाण्यासाठी तरसवले

निम्मे महाराष्ट्र राज्य दुष्काळग्रस्त आहे. या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडत नाही
शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका : थेंब थेंब पाण्यासाठी तरसवले

अहमदनगर : महाराष्ट्रातील एक नेते २०१४ पूर्वी केंद्रात अनेक वर्षे कृषिमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? आमच्या सरकारने सात वर्षांत साडेतेरा लाख कोटी रुपयांचे धान्य शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीला खरेदी केले. त्यांनी केवळ मतांच्या राजकारणासाठीच शेतकऱ्यांचा वापर केला आणि थेंब थेंब पाण्यासाठी तरसवले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख न करता केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांची शिर्डीजवळील काकडी गावात सभा झाली. तत्पूर्वी दुपारी भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने मोदींचे काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. तेथून हेलिकॉप्टरने साई संस्थानच्या हेलिपॅड येथे आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदी यांचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर शिर्डी येथे विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. तसेच निळवंडे धरणाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्षे केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते. व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो, मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले, परंतु आपल्या सरकारने सात वर्षांत साडेतेरा लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले.’’

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘देशाच्या कल्याणासाठी आम्ही काम करत आहोत. मागील दहा वर्षांत देशातील नागरिकांना निराश केले नाही. देशातील गरीब कुटुंबांच्या कल्याणाचे आमचे ध्येय आहे. गरीब कल्याणासाठी सरकारने बजेटही वाढवले आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत गरीबांना मोफत उपचारांसाठी ७० हजार कोटी खर्च केले असून गरीबांच्या घरांसाठीही सरकारने ४० लाख कोटी रुपये खर्च केले. हर घर जल पोहोचवण्यासाठीही आतापर्यंत २ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. शेतकऱ्यांना आता एकूण १२ हजार रुपये मिळतील. आपल्याला शेतकऱ्यांच्या नावावर मते मागून थेंब थेंब पाण्यासाठी तरसवले आहे. महाराष्ट्राला ५ दशकांपासून ज्या निळवंडे धरणाचे वेध होते, ते काम आज पूर्ण झाले. ज्या कामांचं भूमिपूजन मी केलं, त्याचे उद्घाटन करण्याचा योगही मलाच आला. आज जेव्हा या धरणामधून पाणी सुरू झाले, हा परमात्म्याचा प्रसाद आहे. आता एक थेंबही वाया घालवू नका, असे आवाहन शेतकऱ्यांना करत आम्ही चांगल्या नियतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

त्यांनी फक्त घोटाळे केले

पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मागील सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘गरीबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. आतापर्यंत १ कोटी १० लाख नागरिकांनी आयुष्मान कार्ड अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. गरीबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी ४ लाख कोटी रुपयांचा खर्च केला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यावसायिकांना मदत केली. मी लाखो कोट्यवधी रुपयांचे आकडे सांगत आहे. हेच आकडे आपण आधीच्या सरकारने केलेल्या घोटाळ्यांचे ऐकले असतील. त्यांनी फक्त घोटाळे केले, पण आम्ही विकास करतोय, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

त्यांच्या पोटदुखीवर आमच्याकडे औषध -मुख्यमंत्री

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी ज्या कामाचे उद्घाटन करतात, तो प्रकल्प वायू वेगाने पुढे जाऊन पूर्ण होत असतो. त्यांच्या हाताला यशाचा परिस असून, हात लावताच सोनं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील भूमिपूजनासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी बोलावत असतो, पण मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखते. त्यांच्याकडे आम्हाला काही बघायचं नाही. अशा पोट दुखणाऱ्या लोकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी विनामूल्य उपचार देण्यात येतात, असा टोलाही शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

दुष्काळमुक्तीसाठी पंतप्रधानांचे

आशीर्वाद हवेत -फडणवीस

निम्मे महाराष्ट्र राज्य दुष्काळग्रस्त आहे. या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यामुळे या भागाला पाणी मिळाले पाहिजे. जोपर्यंत इथे पाणी मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राला लागलेला आत्महत्यांचा कलंक पुसला जाणार नाही. पण, हा कलंक पुसण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच पूर्ण होऊ शकते, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘‘पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी समुद्रात जात आहे, ते पाणी गोदावरी नदीत घेऊन अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाड्याला सुजलाम‌् सुफलाम‌् करू शकतो. याचा पूर्ण आराखडा आम्ही तयार केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे तिन्ही भाग कायम दुष्काळमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in