पवारांनी ५० वर्षांत काय केले? अमित शहा यांचा सवाल

शरद पवार हे पंतप्रधान मोदींकडे गेल्या दहा वर्षांचा हिशेब मागत आहेत. पण शरद पवार हे ५० वर्षे मंत्री होते, एवढी वर्षे महाराष्ट्रातील जनता त्यांना सहन करत आहे. त्यांनी ५० राहू द्या, निदान पाच वर्षांचा तरी...
पवारांनी ५० वर्षांत काय केले? अमित शहा यांचा सवाल

जळगाव : शरद पवार हे पंतप्रधान मोदींकडे गेल्या दहा वर्षांचा हिशेब मागत आहेत. पण शरद पवार हे ५० वर्षे मंत्री होते, एवढी वर्षे महाराष्ट्रातील जनता त्यांना सहन करत आहे. त्यांनी ५० राहू द्या, निदान पाच वर्षांचा तरी हिशेब महाराष्ट्राला द्यावा, अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युवा संमेलनात मंगळवारी केली.

भाजपने नंदुरबार, धुळे, रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंघातील युवकांसाठी युवा संवाद संमेलनाचे आयोजन सागरपार्क मैदानावर केले होते. प्रथमच मतदान करणाऱ्या विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी या संमेलनास मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यात युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. अमित शहा यांच्यासोबत या संमेलनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

युवकांना ‘मेरे दिल के टुकडे’ असे संबोधत अमित शहा यांनी यावेळी भाषणास प्रारंभ केला. संमेलनास असलेली युवकांची प्रचंड उपस्थिती पाहून मी या युवाशक्तीला नमन करतो. असे सांगत ते म्हणाले, आज देश जगात सन्मानाने उभा आहे. याचा पाया शिवाजी महाराजांच्या कार्यात आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही भारताला आत्मनिर्भर बनवणारी असल्याचे सांगत ही निवडणूक युवकांची आहे, युवकांच्या भविष्याची असल्याचे त्यांनी सांगितले.

युवकांनो तुम्ही प्रथम मतदान करत आहात, लोकतंत्र मजबूत करणाऱ्या पक्षाला मत देण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, आज घराणेशाहीसाठी एकत्र आलेले पक्ष देश मजबूत ठेवू शकत नाहीत. काँग्रेसच्या सोनिया गांधी या राहुलला पंतप्रधान करू इच्छितात, तर उद्धव ठाकरे हे आदित्यला मुख्यमंत्री आणि शरद पवार हे आपल्या कन्येला मुख्यमंत्री करू पाहतात. ममता बॅनर्जी भाच्याला मुख्यमंत्री करू पाहत आहेत. यात घराणेशाही आहे, प्रत्येकाचा स्वार्थ आहे, तुम्हा युवकांचा विचार आहे कुठे? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे तुमच्यासाठी तुम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे आहे, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी आघाडीचा उल्लेख ‘तीनही चाके पंक्चर असलेली रिक्षा’ असा केला. शरद पवार ५० वर्षे मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्राला धो धो धुतले तरी जनता सहन करत आहे. मात्र, हेच पवार मोदींकडे दहा वर्षांचा हिशोब मागत आहेत. त्यांनी पन्नास राहू द्या, पण निदान पाच वर्षांचा तरी हिशोब जनतेला द्यावा, अशी मागणी शहा यांनी केली.

काँग्रेसची कारकीर्द व भाजपची तुलना करताना मनमोहन सिंग यांनी सत्ता सोडताना देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावर होती, ती आज पाचव्या स्थानार आहे. आपल्याला येत्या पाच वर्षात देशाला तिसऱ्या स्थानावर आणायचे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने युवकांसाठी केलेल्या विकास कार्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सोनिया गांधींना फक्त मुलांची चिंता !

सोनिया गांधी राहुलना तिसऱ्यांदा लाँच करत आहेत. इंडिया आघाडीतील पक्षांना आपल्या मुलांची चिंता आहे. असे सांगत तुम्हाला काय हवंय, असा सवाल त्यांनी युवकांना करताच ‘मोदी, मोदी’ असा जल्लोष झाला.

काँग्रेसने नारे दिले, मोदींनी करून दाखवले - फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, काँग्रेसने केवळ ‘गरिबी हटाव’चे नारे दिले. पण गेल्या दहा वर्षांत मोदींनीच परिवर्तन करून दाखवले, अखेरच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचवण्याचे काम केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, देशाची सीमा सुरक्षित केली असून इतर देशांना जे जमले नाही ते करून दाखवले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेदेखील यावेळी भाषण झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in