पटोले आणि थोरात वाद नेमका काय ? थोरात भाजपमध्ये जाणार ?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेब थोरात हे अतिशय ज्येष्ठ नेते असून त्यांच्यासारख्या नेत्यांना भाजपचे दरवाजे कायम खुले
पटोले आणि थोरात वाद नेमका काय ? थोरात भाजपमध्ये जाणार ?

काँग्रेस नेते राहुल गांधी एकीकडे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी भारत जोडो यात्रा करत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षात राज्याच्या पातळीवरील नेत्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा थेट हायकमांडकडे सोपविला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थोरात यांचा राजीनामा मला प्राप्त झालेला नाही, थोरात यांनी आपल्याशी संपर्कही साधलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपले थोरात यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी राजीनामा दिल्याचे आपल्याला सांगितल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब थोरात हे अतिशय ज्येष्ठ नेते असून त्यांच्यासारख्या नेत्यांना भाजपचे दरवाजे कायम खुले असतील, असे जाहीर करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. यामुळे आता बाळासाहेब थोरात काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सत्यजित तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून हा वाद सुरू झाला. बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा आहेत. तांबे यांच्या बंडखोरीनंतर नाना पटोले यांनी सत्यजित व त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. नगरमधील काँग्रेस तसेच भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजित यांचा प्रचार केला होता. सत्यजित विजयी झाले. यानंतर पटोले-थोरात वाद विकोपाला गेला. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य आहेत. विधिमंडळाचे ते गेल्या ४० वर्षांपासून सदस्य आहेत. सध्या त्यांच्याकडे काँग्रेस विधिमंडळ नेतेपद आहे. इतके ज्येष्ठ असूनही आपला मान राखला जात नसल्याचे सांगत थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट हायकमांडकडे सोपविला आहे. यावरून आता प्रदेश काँग्रेसमधील वाद आणखीन वाढणार आहे.

येत्या १५ फेब्रुवारी रोजी प्रदेश कार्यकारिणीची होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. सत्यजित तांबे आणि आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची हायकमांड काय दखल घेणार, हे पहावे लागणार आहे. मात्र, यावरून काँग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाला आता उकळी येणार आहे. काँग्रेसमधील एक गट भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. पटोले-थोरात वादाची परिणती आता नेमकी कशात होणार, हे पहावे लागणार आहे. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार लांबण्यामागे हेच कारण असल्याचे सांगण्यात येते. तसे असेल तर लवकरच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन राजकीय भूकंप पहायला मिळू शकतो.

मला राजीनामा मिळालेला नाही

‘‘बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याचे मला माहिती नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मला प्राप्त झालेला नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. बाळासाहेब थोरात यांच्याशी आपला संपर्कही होऊ शकलेला नसल्याचेही पटोले म्हणाले.

थोरात यांनी राजीनामा दिला-अजित पवार

‘‘बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण फोन केला होता. शुभेच्छा दिल्यानंतर आपण त्यांच्याशी पुणे पोटनिवडणुकांबाबत चर्चा केली, तेव्हा त्यांनी आपण विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

logo
marathi.freepressjournal.in