सध्या मुलाखती दिल्या जात आहेत; पण मी जेव्हा मुलाखत देईन तेव्हा राज्यात आणि देशात भूकंप होईल. धर्मवीर आनंद दिघेंसोबत काय झाले ते योग्य वेळी नक्की सांगेन, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. शिंदे मालेगावमध्ये सभेला संबोधित करताना बोलत होते.
“आनंद दिघे यांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेतले. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत त्यांनी शिवसेना वाढीसाठी काम केले; पण त्यांच्याबाबतीत खूप राजकारण झाले. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. त्यांच्यावर ओढावलेले प्रसंगदेखील मी पाहिले आहेत. मी ज्या दिवशी माध्यमांना मुलाखत देईन, त्या दिवशी राज्याच्या राजकारणात भूकंप होईल. सध्या मी काही बोलणार नाही; पण समोरुन तोंड उघडले गेले, तर मी पण शांत बसणार नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बंड करून पेटून उठा, हीच त्यांची शिकवण आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
“ज्यांच्यासोबत लढलो, त्यांच्याविरोधात जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी वेगळी भूमिका घेतली. मुख्यमंत्रिपदासाठी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी कधी तडजोड केली नाही, त्यांनी विचारांशी कधी प्रतारणा केली नाही. उद्धव ठाकरे आणि माझ्यातील ज्या गोष्टी आहेत, त्या मी आज सांगणार नाही. मात्र, एक दिवस मलाही तोंड उघडावे लागेल, मलाही भूकंप करावा लागेल. मी कधीही कोणावर खालच्या भाषेत बोलत नाही; मात्र अन्याय झाला तर सहन करणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.
धर्मवीर रुचला नाही
“धर्मवीरांचा चित्रपट काही लोकांना रुचला नाही. आम्ही गद्दार नाही तर क्रांती केली आहे. ५० लोक पक्षातून बाहेर पडले, या मागच्या आमच्या भूमिकेची ३३ देशांत चर्चा झाली. तर आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला. आमची भूमिका लोकांनी स्वीकारली म्हणूनच आमचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत लढलो, हिंदुत्वाची भूमिका घेऊन लढलो, मग आम्ही काय चूक केली. आम्ही सेना वाचवण्याचे काम केले,” असेही शिंदे म्हणाले.