पुण्यात चाललंय काय? पोलिसच बनले चोर, काळभोर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यातील काळाभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिस या आरोपीची चौकशी करत असताना...
पुण्यात चाललंय काय? पोलिसच बनले चोर, काळभोर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार
Published on

पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असते. मात्र, आता पोलिसांनीच तेही पोलीस ठाण्यातच चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील काळभोर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रताप केला आहे. पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या दुचाकी परस्पर विकल्याचे समोर आले आहे. पोलीस हवालदार दयानंद दशरथ गायकवाड, पोलीस नाईक संतोष शंकर आंदुरे, पोलीस शिपाई तुकाराम सदाशिव पांढरे, पोलीस शिपाई राजेश मनोज दराडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील काळाभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलीस या आरोपीची चौकशी करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत काही पोलिसांनीच भंगारातील दुचाकी असल्याचे सांगत त्या परस्पर विकायला सांगितल्या, असे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले.

या चारही पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी आरोपीला हे कृत्य करायला भाग पाडल्याचे समजते. यानंतर वेळोवेळी या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले. मात्र, त्यांनी टाळाटाळ केली. ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. यामुळे कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सोमवारी या चारही पोलीस कर्मचाऱ्यांची निलंबनाची ऑर्डर जाहीर केली.

पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन हे खात्याच्या शिस्तीस धरुन नसून अत्यंत गंभीर, बेजबाबदार, अशोभनीय व बेशिस्तपणाचे व गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे आदेशात नमूद करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, निलंबन कालावधीत मुख्यालय सोडून जायचे असल्यास उपोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे शहर यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय येथे हजेरी देणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in