
अरविंद भानुशाली
महायुतीचा विजय होणार हे जरी सत्य असले तरी एवढा मोठा ऐतिहासिक विजय होईल याची कल्पना दस्तुरखुद्द महायुतीच्या नेत्यांना देखील नव्हती. आता मुख्यमंत्री कोण हे सोमवारी ठरणे बाकी आहे. केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर ठाम आहे. विशेष म्हणजे लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांची मते मोठ्या प्रमाणात महायुतीकडे गेली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यात मुख्यमंत्री पदाचे दावेदार बाळासाहेब थोरातांचा समावेश आहे. भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांचे समग्र नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे प्रचार दौरे बरोबर देशभरातील भाजप टीम महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल होती त्यांचे हे यश आहे.
लोकसभा निवडणुकीत ३१ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीची चार ते सहा महिन्यात एवढी पडझड कशी झाली? आता तर विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्या होते की नाही अशी शंका दिसते. २०१४ मध्ये लोकसभेत काँग्रेसला ५८ जागा मिळाल्याने विरोधी पक्ष नेताच नव्हता. ती परिस्थिती महाराष्ट्रात आज उदभवली आहे. महाविकास आघाडीची सत्ता संकेत असताना त्यांचे पानिपत व्हावे हे आश्चर्य आहे. १९७७ च्या निवडणुकीची यावेळी आठवण झाली. विशेष म्हणजे यावेळी अपक्ष एकत्र येऊन राज्यात सरकार बनवतील अशी भीमदेवी गर्जना महायुतीचे पोसलेले बच्चू कडू यांनी केली होती; परंतु मतदारांनी त्यांचाच निवडणुकीत पराभव करून कडू यांची स्वप्ने धुळीला मिळवली आहेत. वसई पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व गेली १५-२० वर्ष कायम होते; परंतु यावेळी त्यांचा बालेकिल्लाही पूर्णपणे ढासळला. स्वतः दस्तुरखुद्द हितेंद्र ठाकूर व त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर या दोघांनाही पराभव पत्करावा लागला. त्यांच्या तिन्ही जागा महायुतीने जिंकल्या. मनसेला एकही जागा मिळाली नाही. महाराष्ट्रभर त्यांच्या प्रचंड मोठ्या सभा होऊनही लोकांनी त्यांना मतदान केले नाही. तीच अवस्था वंचित आघाडीची झाली. या सर्व पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास १९७७ ची त्सुनामी ह्या वेळेस दिसून आली. १९९५ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले; परंतु भाजपाला १३७ जागा कधी जिंकल्याचे जाणवले नाही. शिवसेना ७१ व भाजप ६४ असे त्यावेळी गणित होते. यावर्षी तर २०१४, २०१९ चे आकडे धुवून टाकून देवेंद्र फडणवीस यांनी १३७ जागा जिंकल्या हे प्रथमच घडले. यामागे भाजप कार्यकर्त्यांचे पाठबळ, बुथवरील व्यवस्था, राष्ट्रीय स्वयं संघाचे पाठबळ, यामुळे हा विजय भाजपच्या पारड्यात पडला.
या अभूतपूर्व यशाचे श्रेय महिला मतदारांकडे मोठ्या प्रमाणावर जात आहे. काँग्रेस, शिवसेना व उबाठा व राष्ट्रवादी (शरद पवार) यांची मुस्लिम एकगठ्ठा मतं महिला मतांपुढे फिकी पडली. यापूर्वी सह्याद्रीचे वारे या सदरामधून जरांगे फॅक्टर, फुकाचा ठरणार असे म्हटले होते ते सत्य झाले. विशेष महाजन ज्या जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथील मंत्री राजेश टोपे यांनी सर्व रसद जरांगे पाटील यांना पुरविली होती असे पुढे आले होते तेही निवडणुकीत पराभूत झाले. त्यांनाही वाचविण्याचे प्रयत्न जरांगे यांचेकडून झाले नाहीत.
विशेष म्हणजे यावेळेस नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री पदाचे दावेदार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाला आहे. ते आपल्या जागाही वाचवू शकले नाहीत. विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचे एकेकाळचे स्नेही जयकुमार गोरे हे मोठ्या मताधिक्याने भाजपच्या तिकिटावर निवडून आले. एकूण महाराष्ट्राचे चित्र पाहिल्यास विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण व मुंबई या सहाही विभागांमध्ये महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला. एवढी दाणादाण १९९५ मध्ये झाली नव्हती याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपच्या टीमला द्यावे लागेल. त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांनी व्यवस्थितपणे या निवडणुकीला सामोरे जाऊन विजय प्राप्त केला एवढेच नव्हे तर जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपला लक्ष्य केले होते. त्याचा उलट परिणाम यावेळी दिसून आला. भाजपाचा पश्चिम महाराष्ट्रातला विजय हा महत्वाचा समाजाला जातो.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी छातीवर हात मारून सांगितले होते की मी महायुतीला गाडल्याशिवाय निवृत्त होणार नाही. परंतु झाले उलटे अजित दादांच्या बरोबर ३१ आमदार गेले होते तर त्यांनी ४२ आमदार निवडून आणले. तीच स्थिती मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांची झाली. ३९-४० आमदार घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र त्यांचे आज ५१-५२ आमदार निवडून आले हे पाहता शिवसेना व राष्ट्रवादी फुटीर गटाचा फायदा झाल्याचे दिसून येते.
विदर्भात तर भाजपची अक्षरशः त्सुनामी आली. आता सगळ्यांचे लक्ष मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागले आहे. याचा फैसला २५ नोव्हेंबर रोजी होईल; परंतु एक निश्चित की भाजपाला मिळालेल्या १३७ जागा पाहता मुख्यमंत्री हा भाजपाचा होईल यामध्ये शंका नाही.