संजय परब
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या रणसंग्रामात विरोधी पक्षांची इतकी दयनीय अवस्था होईल, अशी सत्ताधारी पक्षांना सुद्धा कल्पना नव्हती. ‘अनाकलनीय’ या एकाच शब्दात जाहीर झालेल्या निकालाचे वर्णन करता येईल. हा निकाल पाहून मतदारांनी विरोधकांना वनवासात पाठवून लोकशाहीची थट्टा उडवली की काय? असे हताश मनाने बोलावे लागत आहे, इतके हे निकाल अनपेक्षित आहेत. लोकसभेला विरोधकांना जिवंत ठेवत मतदारांनी भाजपचा चौफेर उधळणारा वारू महाराष्ट्र राज्यात रोखला होता. मग, आता पाचएक महिन्यात असे काय झाले, की भाजप महायुती २८८ पैकी २२५ पार जातो आणि महाविकास आघाडीला फक्त पन्नासच्या आसपास जागांवर लोटांगण घालावे लागते. एकूणच हा निकाल लोकशाही व्यवस्थेवर विश्वास असणाऱ्या लोकांना पटणारा नाही. यावेळी लाडकी बहीण आणि पैशांचा महापूर आला असला तरी निकालाच्या आदल्या दिवशी महायुतीला दीडशेच्या आसपास जागा मिळतील, असे स्वतः भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सांगत होते. मग एका रात्रीत असा काय चमत्कार व्हावा की महायुतीची प्रचंड मोठी लाट यावी? सत्ताधाऱ्यांनासुद्धा विश्वास वाटणार नाही, असा हा डोके गरगर फिरवणारा निकाल आहे. एकट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीपेक्षा अधिक यश मिळवले असून समतोल आणि विचारी महाराष्ट्र आता अविवेकी राज्यांच्या रांगेत येऊन बसला आहे. सोयाबीन, कांदा, शेतीकर्ज यामुळे त्रस्त असलेला शेतकरी, भरमसाट वाढलेली वीजबिले, आरक्षणाअभावी तडफडणारा मराठा समाज आणि प्रचंड वाढलेली महागाई या जीवन मरणाच्या गोष्टी बाजूला सारून लाडक्या बहिणीसारख्या राज्याची तिजोरी खाली करणाऱ्या योजना या राज्यातील लोकांना हव्या असतील आणि पाचशे हजार रुपये घेऊन इथली विवेकी जनता आपले मत विकणार असेल तर माझ्या भविष्यातील महाराष्ट्राचे अराजकतेकडे गेलेले चित्र आजच स्पष्ट दिसत आहे. हा जो काही धक्कादायक निकाल लागला आहे त्याला कोकण सुद्धा अपवाद राहिलेला नाही. उलट उर्वरित महाराष्ट्रात महायुतीविरोधात वातावरण असताना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि मित्रपक्ष यांना बऱ्यापैकी अनुकूल वातावरण होते. शिवसेनेचे झालेले दोन तुकडे यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे कोकणात अस्तित्व राहील की नाही? अशी परिस्थिती असताना आता गुहागरमधून भास्कर जाधव यांचा अपवाद वगळता ठाकरे सेनेचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत आणि ही भविष्याचा विचार करता मातोश्रीसाठी चिंतेची बाब आहे.
कुडाळ मालवणमधून वैभव नाईक आणि राजापूरमधून राजन साळवी यांचा पराभव हा ठाकरे शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. या दोन्ही जागा ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा विषय होता. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे आणि वैभव नाईक अशी बिग फाईट होती. ‘शंभर खोके एकदम ओके’, अशी टीका झालेल्या गुवाहाटी रिटर्न आमदारांमध्ये न जाता ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणारे नाईक आणि साळवी पुन्हा एकदा निवडून येतील, असे वातावरण होते. स्वतः पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जातीने नाईक आणि साळवी यांच्यासाठी प्रचारसभा घेत कोकणील आपल्या हक्काच्या मतदारांना विजयासाठी भावनिक आवाहन केले होते. मात्र या दोन्ही ठिकाणी पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. जनशक्तीपेक्षा धनशक्तीचा विजय झाला असल्याचे चित्र या दोन्ही मतदारसंघात नजर टाकल्यावर दिसून येते. पैशांचा महापूर या दोन्ही मतदारसंघात आल्याचे लोक आता बिनधास्त सांगत आहेत. लोकशाहीची यापेक्षा आणखी काय विटंबना असू शकते! रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा विजयी झाल्याने आता महायुतीला रान मोकळे झाले असून रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प पुन्हा येण्याची भीती पर्यावरण वाचवण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना वाटत आहे. मायनिंगमुळे आधीच उद्ध्वस्त होत चाललेला सुंदर कोकण रिफायनरीमुळे भकास झालेला बघण्याचे नशिबी येऊ नये, इतकी माफक अपेक्षा आहे. सावंतवाडीत अपेक्षेप्रमाणे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर निवडून आले आहेत. भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे सेनेच्या राजन तेली यांना फायदा मिळेल, असे बोलले जात होते. मात्र केसरकर यांनी सहजसोपा विजय मिळवला. तसाच विजय कणकवली येथून नितेश राणे यांनी मिळवला आहे. या मतदारसंघावर नितेश यांनी चांगली पकड मिळवली असल्याचा त्यांना फायदा मिळालाय.
सिंधुदुर्गमध्ये शंभर टक्के यश मिळवणाऱ्या महायुतीने शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा मोठे यश कमावत ठाकरे सेनेच्या इतक्या वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, गुहागर आणि दापोली या पाचपैकी चार मतदारसंघात बाजी मारली आहे. अजित पवार गटाचे शेखर निकम यांना यावेळी मतदारसंघ राखता येतो की नाही अशी शंका होती. पण, त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. उदय आणि किरण या भावांचा विजय शिंदे शिवसेनेपेक्षा स्वतः च्या ताकदीची साक्ष देणारा होता. जसा तो निलेश आणि नितेश या राणे भावांच्या मसलपॉवरची देणारा आहे. गुहागरमधून शिवसेनेचे प्रमुख नेते यांना पाडण्यासाठी महायुतीने आपली सारी ताकद पणाला लावली. पण, खमक्या जाधव यांनी आपला सारा अनुभव पणाला लागत आपला हा मतदारसंघ कायम राखण्यात यश मिळवले. जाधव ही शिवसेनेची मुलुखमैदान तोफ असून असे अनुभवी आमदार विधानसभेत असणे ही संसदीय कमकाज सुरळीत चालण्यासाठी खूप आशादायक बाब ठरते!
रायगडमधून ठाकरे सेनेबरोबर शेतकरी कामगार पक्षाचा बाजार उठला आहे. अलिबाग, उरण आणि पेण या तिन्ही ठिकाणी शेकापला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. याचबरोबर कर्जत, पनवेल, महाड आणि श्रीवर्धन या सातही जागांवर महायुती सरस ठरली आहे. महेंद्र दळवी (अलिबाग), रवी पाटील ( पेण), महेश बालदी (उरण), प्रशांत ठाकूर ( पनवेल), महेंद्र थोरवे ( कर्जत), भरत गोगावले (महाड) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली. आपल्या फायद्यासाठी धरसोडीचे राजकारण शेवटी शेकापच्या मुळावर आले. जयंत पाटील यांनी अलिबाग वगळता रायगडमध्ये आपल्या पक्षाची मुळे आहेत, याचा शोध स्वतः हून संपवून टाकला होता. प्रसंगी कोणाशीही आघाडी आणि युती करत तत्कालीन फायदा मिळवण्याचा हेतू त्यांच्या अस्तित्वावर गदा आणणारा ठरला आहे. तर कर्जत, महाड, अलिबाग या ठिकाणी शिंदे शिवसेनेने ठाकरे सेनेला संपवले आहे.
या विधानसभेच्या निवडणुकीतील निकालावर एक नजर टाकली असता एक लक्षात येते की शिवसेना फोडून भाजपने मातोश्रीच्या हमखास यश देणाऱ्या कोकणातून ठाकरे सेनेला हद्दपार केले आहे. महायुतीचा धर्म निभावताना भाजप एक पाऊल मागे गेले आहे. मात्र आताचे मित्रपक्षाचे यश ही त्यांची भविष्यातील गुंतवणूक असून पुढे ते एकदा फायदा झाला की शिंदे शिवसेनेला बाजूला सारण्यास मागे पुढे पाहणार नाहीत अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मातोश्रीची इतक्या वर्षांची युती भाजप तोडू शकते त्यांना शिंदे शिवसेनेला संपवण्यासाठी फार काळ लागणार नाही.