Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

तिसऱ्या टप्प्यात बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे राज्यसभा सदस्य छत्रपती उदयनराजे भोसले आणि शाहू महाराज छत्रपती अशा दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे.
Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज, ७ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. या टप्प्यात देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९३ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांवर मतदान सुरू आहे. यात बारामती, कोल्हापूर, लातूर, माढा, हातकणंगले, रायगड, धाराशिव (उस्मानाबाद), सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सोलापूर आणि सांगली या मतदारसंघात मतदान होत आहे.

तिसऱ्या टप्प्यात बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, रत्नागिरी-सिंधुदुर्गतून केंद्रीय मंत्री नारायण राणे, साताऱ्यातून भाजपचे राज्यसभा सदस्य छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती अशा दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे.दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यातील ११ मतदारसंघात सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत कुठे, किती मतदान?

 • लातूर- ४४.४८ टक्के

 • सांगली- ४१.३० टक्के

 • बारामती- ३४.९६ टक्के

 • हातकणंगले- ४९.९४ टक्के

 • कोल्हापूर- ५१.५१ टक्के

 • माढा- ३९.११ टक्के

 • उस्मानाबाद- ४०.९२ टक्के

 • रायगड- ४१.४३ टक्के

 • रत्नागिरी–सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के

 • सातारा- ४३.८३ टक्के

 • सोलापूर- ३९.५४ टक्के

महाराष्ट्रात ११ जागांसाठी मतदान

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ११ जागांवर मतदान होणार आहे.

त्यानंतर चर्चा आहे ती रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या लढाईची. येथून नारायण राणे हे भाजपच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचे आव्हान आहे. राऊत हे २०१४ आणि २०१९ असे दोन वेळा निवडून आले असून कोकणी मतदार त्यांना हॅटट्रिकची संधी देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते हे तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यात लढत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. शिवाजी कोळगे आणि भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यात सामना होत आहे. गेल्या दोन निवडणुकांत पराभव पत्करावे लागलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपली राजकीय पत राखण्यासाठी यावेळी मुलगी प्रणिती शिंदेंना सोलापूरमधून उतरविले आहे. भाजपने शिंदे यांच्या विरोधात आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या पाच लोकसभा मतदारसंघांत निकराची लढाई होत आहे. माढामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेस बंडखोर विशाल पाटील अशा तीन पाटलांमध्ये तिरंगी लढत होत आहे. सातारा हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे १९९९ पासून सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. यावेळी भाजपने राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने येथून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांना काँग्रेसच्या शाहू महाराज यांनी आव्हान दिले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत आहे.

logo
marathi.freepressjournal.in