
सांगोला : अजित माझा पुतण्या आहे. पुतण्याला भेटण्यात काय गैर आहे. एका कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती एखाद्या सदस्याला भेटू इच्छित असल्यास त्याचा गाजावाजा केला जाऊ नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
पवार म्हणाले, ‘‘काही हितचिंतक माझे मत वळवण्याचा प्रयत्न करीत असले तरी आपला पक्ष भाजपसोबत युती करणार नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या राजकीय धोरणांमध्ये भाजपशी सख्य कोणत्याही प्रकारे जुळू शकत नाही. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी हे एकदम स्पष्टच करतो की माझा पक्ष भाजपसोबत जाणार नाही. काही हितचिंतक जरी माझे मन वळवण्याचा निकराचा प्रयत्न करीत असले तरी आपला पक्ष कदापि भाजपसोबत जाणार नाही. आमच्यापैकी काही जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यानंतर काही हितचिंतक आमच्या भूमिकेत बदल झाला आहे का, याची चाचपणी करु पाहात आहेत, असे पवार यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
पुण्यात अजित पवार यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीविषयी विचारले असता पवार म्हणाले तो माझा पुतण्या आहे. पुतण्याला भेटण्यात काय गैर आहे. एका कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती एखाद्या सदस्याला भेटू इच्छित असल्यास त्याचा गाजावाजा केला जाऊ नये. याचवेळी पवार यांनी सांगितले की लवकरच राज्यातील जनता कारभाराची सूत्रे उबाठा सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीकडे सोपवणार आहे.