
मुंबई : परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्मित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथचा मृत्यू मारहणीमुळेच झाल्याचे उघड झाले आहे. आता तरी फडणवीस सरकार जागे होऊन संबंधित पोलिसांवर हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करणार आहे का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, परभणीची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे प्रकरण पोलीसांना व्यवस्थित हाताळता आले नाही.
‘न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पाठपुरावा करणार’
परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन व लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला. मंत्रालयातून दिला, का पोलीस महासंचालक कार्यालयातून दिला याची चौकशी झाली पाहिजे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सूर्यवंशीच्या कुटुंबाचे सांत्वन केले व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस पक्ष सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करेल, असे सपकाळ म्हणाले.