
मुंबई / नागपूर : परभणी व बीड जिल्ह्यांत झालेल्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राला व संतांच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशीर्वादाने महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुंडाराजचा कायमचा बीमोड करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात गुंडगिरीला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला आहे. बीडमधील वाल्मिक कराडवर ३०२ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याला पोलीस संरक्षण दिले, त्याला पोलीस संरक्षण देण्याची शिफारस करणारा कोण? त्याला कशासाठी पोलीस संरक्षण दिले? परळीत आंधळे व गीते यांच्यात गोळीबार झाला, त्यात गीते यांचा मृत्यू झाला, या प्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा संबंध आहे. या घटनेवेळी पीआय महाजन व पाटील नावाचे पीएसआय त्या भागात कार्यरत होते. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या केज विभागात हेच महाजन व पाटील पोलीस कार्यरत आहेत, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.
मविआचे आंदोलन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेतील भाषणात अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी नागपूरमध्ये आंदोलन केले. नागपूर येथील संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मविआच्या आमदारांनी या आंदोलनाला सुरुवात केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरही आंदोलन करून भाजप व अमित शाह यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.