
आयपीएलच्या ५७ व्या सामन्यात मंगळवारी गुणतालिकेत सर्वोच्च स्थानावर असलेले दोन संघ लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुकाबला होत असून प्ले ऑफ फेरीत कोण आधी पोहोचतो, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
गुजरातचा संघ लीगमध्ये प्रदीर्घकाळ सर्वोच्चस्थानी राहिला होता. परंतु गेल्या दोन सामन्यात फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला आणि लखनऊ सर्वोच्च स्थानी पाहोचला.या दोनन्ही संघांचे १६ गुण असल्याने विजयी होणारा कोणताही संघ थेट प्ले ऑफमध्ये पोहोचणार आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील गुजरातला गेल्या आठवड्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्याकडून मात खावी लागली होती. लखनऊने गेल्या चार सामन्यांमध्ये विजय मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास अधिक उंचावलेला असणार आहे.
के. एल. राहुलने लखनऊच्या कर्णधारपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्याने आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ४५१ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतक आणि अर्धशतक लगावले आहे. लखनऊची फलंदाची सर्वस्वी राहुलवर अवलंबून आहे. क्विंटन डि‘कॉक आणि दीपक हुडा हेही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असल्याने त्याचा फार काहीसा हलका होणार आहे.
लखनऊची गोलंदाजी प्रभावी राहिली आहे. पंजाब किंग्जविरुध्दच्या सामन्यात त्यांनी १५३ धावांचा चांगल्या प्रकारे बचाव केला होता. कोलकात्याला त्यानंी १०१ धावांतच रोखले होते. जलदगती गोलंदाज आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी चमकदार कामगिरी केली आहे. मोहसिन खान, कृणाल पंड्या आणि दुष्मंत चमीरा यांचीही गोलंदाजी किफायती ठरली आहे. रवि बिश्नोई मात्र गेल्या सामन्यात महागडा ठरला होता.
गुजरातने प्रतिकूल परिस्थितीतून आपली स्थिति मजबूत केली आहे. त्यांच्या वेगवेगळ्या खेळाडूंनी योगदान देत सामना जिंकून देण्याचे काम केले आहे. परंतु मुंबईविरुध्दच्या सामन्यात शेवटच्या षटकात नऊ धावा करण्यात त्यांना अपयश आले होते. गुजरातच्या फलंदाजांना सातत्य राखावे लागेल. वरच्या फळीतील फलंदाजांना मोठ्या खेळी करण्याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. शुभमन गिलला आपली चमक दाखसासी लागेल. ऋद्धिमान साहाला आत्मविश्वास टिकवावा लागेल.
हार्दिक, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांना निर्णायक टप्प्यात आता लयीत परतावे लागेल. गुजरातकडे मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन आणि राशिद खान यांच्यासारखे दर्जेदार गोलंदाज आहेत. शमीला गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल.
प्रतिस्पर्धी संघ
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकीरत सिंह, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवतिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमानुल्ला गुरबाज, ऋद्धिमान साहा, अल्जारी जोसेफ, दर्शन नालकांडे, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप सांगवान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, वरुण आरोन, यश दयाल.
लखनऊ सुपरजायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), मनन वोहरा, एविन लुईस, मनीष पांडे, क्विंटन डि’कॉक, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, आवेश खान, ॲड्रयू टाय, मार्कस स्टोइनिस, काइल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, जेसन होल्डर