परीक्षेहून येताना दोघा भावांसह बहिणीवरही काळाचा घाला; भीषण अपघातात तिघे जागीच ठार
छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपासवर गुरु लॉन्ससमोर आज सकाळी १०.३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर असणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले तिघेही बहिण-भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. शेंद्रा येथे वनरक्षक लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे पदासाठी ग्राऊंड सुरू आहे. येथे मैदानी चाचणी देऊन परत येत असताना ही घटना घडली. प्रवीण अंभोरे(२८), प्रतिक्षा अंभोरे(२२) आणि प्रदीप उर्फ लखन अंभोरे(२५) अशी मृत बहीण-भावांची नावे आहेत. हे तिघेही परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन हायवांमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरु होती. याचदरम्यान एका हायवा चालकाने बीड बायपासवरील गुरु लॉन्ससमोर हे भाऊ-बहीण प्रवास करत असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यावेळी अंगावरुन हायवा गेल्याने या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
प्रतीक्षा आणि प्रदीप हे दोघे जिंतूर तालुक्यातील अकुली या गावात राहतात. तर त्यांचा मोठा भाऊ प्रवीण सातारा परिसरात राहतो. प्रतीक्षा वनरक्षक पदाची लेखी परीक्षा पास झाली आहे. मैदानी चाचणीसाठी ती बुधवारी रात्री जिंतूर येथून मोठा भाऊ प्रदीपसोबत छत्रपती संभाजीनगर येथे प्रवीणच्या घरी थांबली. मैदानी चाचणीसाठी प्रवीणने प्रतीक्षा आणि प्रदीपला एकाच दुचाकीवर आज सकाळी शेंद्रा येथे नेले. मैदानी चाचणी झाल्यानंतर तिघे एकाच दुचाकीवर सातारा परिसरात परत येत असतानाच हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर हायवाचालक पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे अंभोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.