
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली ११००कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही. ट्रस्टकडे गुंतवणुकीव्यतिरिक्त निधी फक्त जुलैपर्यंत पुरेल एवढाच शिल्लक आहे. लागलीच ही रक्कम ट्रस्टकडे भरली नाही तर जुलैनंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम मिळणार की नाही, अशी शंका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्रॅच्युइटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८९ हजार एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे ११०० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्रॅच्युइटीची अंदाजे १००० कोटी रुपये, अशी मिळून अंदाजे २१०० कोटी रुपयांची रक्कम गेले दहा महिने एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. पीएफ ट्रस्टमधून कर्मचारी आपल्या खात्यावरील जमा रकमेतून आर्थिक अडचणीच्या वेळी ॲडव्हान्स रक्कम घेत असतात. परंतु गेले दहा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटीने पीएफ रक्कम ट्रस्टकडे जमा केली नाही. त्यामुळे ऑक्टोबर २४ पासून एकाही कर्मचाऱ्याला पीएफ ॲडव्हान्स रक्कम मिळाली नसल्याचा दावा बरगे यांनी केला आहे.
सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटीला सवलत मूल्य परतावा रक्कम देत असून दर महिन्याला सुमारे ३६० कोटी रुपये रक्कम होत असताना शासनाकडून फक्त ३०० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे. परिणामी कर्मचारी व अधिकारी यांना वेतन दिले जात असून त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या पीएफ, ग्रॅच्युइटी, बँक कर्ज, एलआयसी या रकमा त्या त्या संस्थांना भरल्या जात नाहीत. त्यामुळे सरकारने एसटीला मागणी करण्यात आलेला पूर्ण निधी उपलब्ध करून दिला नाही, तर जुलैनंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम मिळणार नाही, असा दावा ही त्यांनी केला आहे.