
छत्रपती संभाजीनगर : आपल्या मुलाच्या नावे व्हिट्स हॉटेल खरेदी करण्याच्या ६७ कोटींच्या व्यवहारामुळे विरोधकांच्या निशाण्यावर आलेले राज्याचे समाजकल्याण मंत्री तथा संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अखेर पत्रकार परिषद घेत या लिलाव प्रक्रियेतून आपण माघार घेत असल्याचे सांगितले. तसेच कुटुंबावर टीका करून घाणेरडे राजकारण करीत असाल तर आपणही सर्वांची प्रकरणे बाहेर काढू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.
महिनाभरापूर्वीच रेल्वे स्टेशन रोडवरील व्हिट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया पार पडली. पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांनी या लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. दोन-तीन भागीदारांसोबत सिद्धांत यांनी ६७ कोटींना हे हॉटेल विकत घेतले. त्यानंतर लगेचच उपविभागीय अधिकारी कार्यालयाने राबविलेल्या या लिलाव प्रक्रियेवर टीकेची झोड उठली. राजकीय दबावाखाली लिलाव प्रक्रिया राबविल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. पालकमंत्र्यांच्या मुलासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली अन १५० कोटींचे हॉटेल अवघ्या ६७ कोटींत विकल्याचा आरोप दानवे यांनी केला. या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. विरोधकांनी पालकमंत्र्यांवर आरोपांची राळ उडवून दिली. ठाकरे गटाने सातत्याने शिरसाट यांना लक्ष्य केले.
दरम्यान, संजय शिरसाट यांच्या या टीकेला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले. मी आरोप केला नव्हता. मी काही प्रश्न विचारले होते. आरोप कशाकरता करायचे? खरे म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला हवे, या मताचे आम्ही आहोत. शिवसेनेची स्थापना यासाठीच झाली आहे. आपली मराठी मुले, मराठी तरुण यांनी नोकऱ्या न करता ते नोकऱ्या देणारे व्हावेत. त्यांनी उद्योग करावेत. फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून, अशाप्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्राची लूट करू नका, अशी आमची भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले शिरसाट...
प्रशासनाने तब्बल सात वेळा या हॉटेलची लिलाव प्रक्रिया राबविली. मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही, मराठी माणसाने व्यवसायात पडावे या उद्देशाने मुलासाठी हे हॉटेल खरेदी केले होते. लिलाव प्रक्रियेत तो एकटा नव्हता, भागीदारही होते. मात्र विरोधकांना मराठी माणूस व्यवसायात उतरतोय हे सहन झाले नाही. त्यांनी कुटुंबावरच चिखलफेक केली. हे घाणेरडे राजकारण सहन होण्यासारखे नाही. या लिलाव प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
लूटमार करून व्यवसाय करू नका : दानवे
मराठी माणसाने व्यवसाय जरूर करावा, मात्र अशी लूटमार करून करू नये. पालकमंत्र्यांनी माघार घेतली नसती तर प्रशासनाने ही प्रक्रिया रद्द केली असती. शासकीय यंत्रणेवर त्यांनी दबाव आणला होता हे लपून राहिलेले नाही, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.