

पुणे : पुण्यातील मुंढवा येथील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून बेकायदेशीर खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचा व्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण आहेत? कारण उपमुख्यमंत्री हे पदच अस्तित्वात नाही. हा व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा असून त्या कायद्यानुसारच तो रद्द होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वा अजित पवार कोणीही हा व्यवहार रद्द करू शकत नाहीत. जर सरकारने हा व्यवहार रद्द केला तर मी याविरोधात न्यायालयात जाणार, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले.
पुण्यातील मुंढवा येथील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून बेकायदेशीर खरेदी करण्यात आली. त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यावर व्यवहार रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले गेले. मात्र, प्रशासनाने जोपर्यंत ४२ कोटी रुपये भरत नाही तोवर व्यवहार रद्द होणार नाही, अशी नोटीस दिली असून त्याला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी पुणे येथे येऊन संबंधित जागेला भेट दिली आणि महार वतनाच्या मूळ मालकांशी संवाद साधला.
यावेळी दमानिया म्हणाल्या की, मी आत्तापर्यंत ज्या ज्या विषयात लढले आहे त्याची माहिती घेऊनच लढत असते. ही जमीन कुठे आहे? कोणाच्या ताब्यात आहे? आता तिथं काय चाललं आहे याबाबत माहिती घेण्यासाठी मी या मुंढवा येथील जमिनीवर आले आहे. येथील गेटवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी माझ्याशी चांगला संवाद साधला आणि त्यांनी सांगितले की, तुमच्याकडे परवानगी असेल तर तुम्हाला आत सोडण्यात येईल. मी त्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलले पण ते अतिशय उद्धट आहेत. त्यांनी आम्हाला आत जाण्यासाठी परवानगी नाकारली. त्यांना कोणाचा फोन आला हे माहीत नाही, पण त्यांनी आम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी नाकारली. मी याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी माहिती घेऊन लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, मुठे समितीचा अहवाल आज येणार होता, पण अजूनही आलेला नाही. कोणताही अहवाल आला तसेच कोणतीही समिती किंवा कोणतेही अधिकारी असे म्हणू शकत नाही की जे काही झाले आहे ते कायदेशीर झाले आहे. ही जमीन बॉटनिकल गार्डनला लीजवर दिली होती. २०३८ पर्यंत जर लीजवर देण्यात आली होती, तर आत्ता या जमिनीवर काय चालले आहे हे मला पाहायचे होते. ही जमीन संशोधनासाठी देण्यात आली होती. १६ जूनला इथे काही माणसांनी आत जाऊन तमाशा केला ती माणसे कोण होती याची मला माहिती घ्यायची होती. पण त्यांनी मला परवानगी नाकारली. येथील अधिकारी अतिशय उद्धट आहेत. या जमिनीत मधल्या काळात काय काय झाले आहे याची मला माहिती घ्यायची होती. म्हणून मी आज इथे आले, असे त्या म्हणाल्या.
अजित पवार यांनी राजीनामा द्यावा!
सिंचन घोटाळ्यात त्यांनी राजीनामा दिला होता. आताही त्यांनी राजीनामा द्यायला हवा. अजित पवार पालकमंत्री आहेत. त्यामुळे निष्पक्ष चौकशी होणार का? असा प्रश्न आहे. या प्रकरणात त्यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.