अमृता फडणवीस प्रकरणात अटक करण्यात आलेली अनिक्षा जयसिंघानी नेमकी कोण ?

सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली असल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत स्पष्ट केले
अमृता फडणवीस प्रकरणात अटक करण्यात आलेली अनिक्षा जयसिंघानी नेमकी कोण ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी उल्हासनगरमधून एका तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी वादग्रस्त क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. दरम्यान, "आपल्या कुटुंबाला चुकीच्या पद्धतीने अडकवून मला अडचणीत आणण्याचा प्लॅन रचण्यात आला होता. यात संबंधित व्यक्तीने अनेक नेत्यांची नावे घेतली आहेत. या प्रकरणातील पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल', असा खळबळजनक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

उल्हासनगर कॅम्प नंबर एक परिसरात राहणारी अनिक्षा जयसिंघानी नावाच्या महिला डिझायनर आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपयांची लाच ऑफर केली होती. या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी आरोपींचा कॉल आणि मेसेज आल्यानंतर मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ साली पहिल्यांदा भेट झाली होती. आरोपी अनिक्षाने अमृता यांना सांगितले होते की, ती कपडे आणि दागिन्यांची डिझायनर आहे. मी डिझाईन केलेले कपडे आणि दागिने अमृता यांनी सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती आरोपी अनिक्षा हिने केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली असल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत स्पष्ट केले.

त्यानंतर पुण्यातील एका कार्यक्रमात अनिक्षा पुन्हा अमृता यांना भेटली. कार्यक्रम संपल्यानंतर अनिक्षाला मी कारमध्ये बसवले तेव्हा अनिक्षाने म्हटलं की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत आहेत. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन आपण पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर मी अनिक्षाला कारमधून खाली उतरवले असल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी तरूणीने यानंतर तिच्या वडिलांवर एका गुन्ह्यात आरोप करण्यात आले असल्याचे अमृता फडणवीस यांना सांगितले होते. या प्रकरणात त्यांना बाहेर काढण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपये देण्याची तयारी असल्याचे सांगत, या गुन्ह्यातून वडिलांना बाहेर काढण्याची विनंती अमृता यांना फोनद्वारे केली होती. यानंतर अमृता यांनी फोन कट करत तिला ब्लॉक केले. तिने पुन्हा अनोळखी नंबरवरून अमृता फडणवीस यांना व्हॉट्सअॅपवरून व्हिडिओ क्लीप, व्हॉईस नोटस पाठवले होते. त्यानंतर हा नंबर आरोपी अनिक्षा हिच्या वडिलांचा असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी पोलिसांना दिली होती. दरम्यान गुरुवारी सकाळच्या सुमारास मलबार हिल पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उल्हासनगर कॅम्प नंबर एक मधील मायापुरी या इमारतीत फ्लॅट नंबर 801 मध्ये छापा टाकून आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in