- अतुल जाधव
लोणावळा येथील धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील अन्सारी कुटुंबातील पाच सदस्य पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने वाहून गेल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा प्रशासनाने अशा गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी दिनांक १५ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत पावसाळी पर्यटनावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. सदर निर्णयाबाबत पर्यटनप्रेमींकडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असल्या तरी प्रशासनाने आपली जबाबदारी टाळण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासन जबाबदारी टाळण्यासाठी सरसकट पर्यटनस्थळांवर बंदीचा निर्णय घेत असल्यामुळे पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. बंदी घालून जबाबदारी झटकण्यापेक्षा पर्यटन स्थळे सुरक्षित कशी होतील, याचा विचार होणे गरजेचे असल्याचा सूर ऐकावयास मिळत आहे.
पावसाळी पर्यटनाचा आनंद ही वेगळी गोष्ट आहे. अतिउत्साही पर्यटकांमुळे एखादी दुर्घटना घडली तर त्याची शिक्षा इतर पर्यटकांना का? असा त्यांचा प्रश्न पर्यटक उपस्थित करत आहेत. पावसाळ्यात धबधबे वाहण्यास सुरुवात होतात, तेव्हाच पर्यटक पर्यटनस्थळी जाण्याचे बेत आखतात. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नदी, धबधबे मोठे पाणवठे या ठिकाणी पावसाळ्यात तुडुंब गर्दी असते.
हंगामी पर्यटन हंगामी रोजगारही निर्माण करते. धरण आणि धबधब्यांच्या परिसरातील आदिवासींनाही यानिमित्ताने चार पैसे गाठीला बांधण्याची संधी मिळते. स्थानिक व्यापाराचीही वाढ होते हेही विसरता येणार नाही. त्यामुळे पावसाळी पर्यटन स्थळे निर्धोक होतील आणि पर्यटक पर्यटनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकतील, याची दक्षता प्रशासनाने घ्यायची की अपघात घडतात म्हणून पर्यटनस्थळांवरच बंदी घालायची? हा कळीचा मुद्दा आहे. सर्वच शहरात सध्या ‘विकेंड’ पर्यटनाचा कल मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अनेकजण आठवड्याचा कामाचा शीण घालवण्यासाठी शनिवार-रविवार सुट्टीचा मुहूर्त साधून सहकुटुंब सहलीचे बेत आखत असतात. त्याला जोडून एखादी शासकीय सुट्टी असली तर त्यांच्यासाठी तो दुग्धशर्करा योगच ठरतो. ज्यांना ते शक्य नसते ते अशा एखाद्या पर्यटन स्थळी जाऊन रविवारचा दिवस देखील आनंदात घालवण्याचा प्रयत्न पर्यटक करत असतात. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येते.
लोणावळा या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या अनेक पर्यटनस्थळी शनिवार-रविवारी जाण्यावर स्थानिक पोलिसांनी बंदी घातली आहे. या बंदीमुळे नेमके काय साध्य होणार असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे. अपघात फक्त याच दोन दिवशी होतात का असा उलट प्रश्न देखील पर्यटकांनी उपस्थित केला आहे.
आठवड्याच्या अन्य वारी मात्र पर्यटन स्थळांवर कोणतेही अपघात होत नाहीत असा प्रशासनाचा भाबडा समज आहे. अनेकदा कुठल्याही समस्येचा उपाय म्हणून सोपी पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पावसाळी पर्यटनावर बंदी घालून जिल्हा प्रशासनाने असाच सोपा मार्ग शोधला आहे.
पर्यटनस्थळांवरचे अपघात रोखण्यासाठी अशी दूरदृष्टी राज्यासह स्थानिक प्रशासनानेही दाखवली पाहिजे. कारण पर्यटक धोका त्याच्या खुशीने पत्करतो असे म्हटले तरी शेवटी त्याचा जीव गेला तर त्याचा ठपका संबंधित प्रशासनावरच पडत असतो. अर्थात, पर्यटकांनाही स्थळ-काळ आणि वेळेचे भान ठेवायलाच हवे. धबधबे आणि धरण परिसरात गेल्यावर, गिर्यारोहण करताना अनावश्यक धाडस दाखवू नये.
अनेक ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यापेक्षा हुल्लडबाजी करण्यात पर्यटक आनंद मानत असतात. वाहत्या पाण्यात मस्ती करताना सेल्फीच्या नादात तोल जाऊन बळी जाण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. निसर्गाच्या शक्तीला गृहित धरू नये, गोंधळ घालू नये, खोल खळळत्या पाण्यात उतरू नये, अनोळखी दऱ्याखोऱ्यांमध्ये जाण्याचा अनाठायी मोह देखील टाळला पाहिजे.
पर्यटकांना भान ठेवणे गरजेचे
धबधबा दिसला की अनेक पर्यटकांना त्यात डुबकी मारण्याचा मोह आवरता येत नाही. अनेक पर्यटक पोहता येत नसले तरी खोल पाण्यात उतरण्याचे धाडस करतात. अशामध्ये नशाबाजी करून पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे अशा घटना घडत असतात. या घटना टाळण्यासाठी सुरक्षा आवश्यक आहे. मात्र सुरक्षित पर्यटन स्थळे विकसित करण्याची जबाबदारी शासनाची देखील आहे याचा विसर शासनाला पडला आहे. एखादी दुर्घटना घडल्यास दुर्घटनेचे बिल पर्यटकांच्या नावावर फाडले जाते, परंतु दुर्घटनेला फक्त पर्यटकांचे वागणे जबाबदार आहे का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न असून प्रशासनाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अडचणी
लोणावळा दुर्घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा एकदा बंदीचा राग आळवला. पोलीस विभागात असलेल्या मनुष्यबळाची कमतरता हे देखील या मागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नदी, नाले, ओढे या सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणे अशक्य आहे. मात्र ज्या धबधब्यांवर दुर्घटना घडू शकते अशा ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे. धबधब्यांतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला स्नानाच्या ठिकाणी कठड्यांची कायमची कुंपणे घातली गेली तर सुरक्षा आणि पर्यटनाचा आनंद या दोन्ही गोष्टी साध्य होतील. परराज्यात अनेक ठिकाणी या पद्धतीची व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद बिनधास्तपणे पर्यटक लुटताना दिसत आहेत.