तटकरेंच्या यशाचे शिल्पकार कोण ? हजारोंची लीड कुठून मिळाली ?

रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत तुल्यबळ झाली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएक्स @SarmaVanik5435

धनंजय कवठेकर/ रायगड

रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत तुल्यबळ झाली. अखेर रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनिल तटकरे ८२ हजार ७८४ हुन अधिक मतांनी विजयी झाले. सुरुवातीपासूनच तटकरे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले होते. तर शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते हे पिछाडीवर होते. सुनिल तटकरे यांनी सलग दुसऱ्यांदा अनंत गीतेंचा परभाव केला आहे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. मात्र तटकरेंच्या यशाचे शिल्पकार कोण ? हजारोंची लीड कुठून मिळाली ? याबाबतचे आकडे अगदी आश्चर्यकारक असेच आहेत. तटकरेंना पेण आणि अलिबागकरांनी तारले मात्र तळ कोकणात दापोली, गुहागरमधील मतदारांनी मारले असेच परिस्थितीचे वर्णन समर्पक ठरेल.

या निवडणुकीत सुनील तटकरे यांना सुमारे ५ लाख ८ हजार ३५२ मतं मिळाली. तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ६६८ मते मिळाली. तब्बल २७ हजार २७० जणांनी नोटाचे बटन दाबले. वंचित आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण मतदारांवर प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरल्या. त्यांना १९ हजार ६१८ मते मिळाली. अन्य उमेदवार देखील सपशेल अपयशी ठरले.

मात्र सुनील तटकरेंच्या विजयाचे शिल्पकार ठरले पेण आणि अलिबाग हे २ तालुके, पेण तालुक्यात तब्बल १ लाख १२ हजार ९९५ मतदारांनी तटकरेंना एकहाती मतदान केले तर पेणमधून गीतेंना ६६ हजार ५९ इतके मते पडली. भाजपचे रवीशेठ पाटील आणि धैर्यशील पाटील यांचीही ही किमया म्हणावी लागेल. त्यापाठोपाठ शेकापची पकड असलेल्या अलिबाग तालुक्यात जयंतभाईंचा बुरुज डळमळीत झाल्याचे चिन्ह दिसले. शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील जातीने प्रचारात उतरले असतानाही अलिबागकरांनी तटकरेंना साथ दिली. सुमारे १ लाख १२ हजार ६५४ मते तटकरेंना मिळाली तर गीतेंनी ७३ हजार ६५८ मते अलिबागमधून मिळवली. श्रीवर्धन तालुक्यातही तटकरेंचा प्रभाव दिसला. तटकरेंना ८६ हजार ९०२ मते मिळाली तर येथे ५७ हजार ३० मतदारांनी गीतेंना पसंती दिली.

तळ कोकणात मात्र चित्र काहीसे उलट दिसले. योगेश कदम यांनी जंग जंग पछाडून देखील कोकणातील दापोली आणि गुहागरमध्ये तटकरेंना गीतेंनी पिछाडीवर टाकले.

दापोलीत ७७ हजार ५०३ मतदारांनी गीतेंना मतदान केले तर ६९ हजार ७१ मतदारांनी तटकरेंना पसंती दिली. गुहागरमध्ये भास्कर जाधवांचा गड भक्कम असल्याचे ७४ हजार ६२६ मतदारांनी गीतेंना कौल दिला तर फक्त ४७ हजार ३० मतदारांनी तटकरेंना साथ दिली. महाडमध्ये मतदारांचा काहीसा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. महाडमध्ये ७७ हजार ८७७ मतदारांनी सुनील तटकरेंना मतदान केले तर ७४ हजार २६१ मतदारांनी अनंत गीतेंना आपले मत दिले.

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने मला कोकणाचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी पुन्हा संधी दिली आहे. जनतेचा मी आजन्म ऋणी राहीन, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया लोकसभा विजयानंतर सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in