पानसरेंनी शिवाजी कोण होता? लिहिले म्हणून हत्या! कुटुंबीयांचा हायकोर्टात दावा

याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शाम चंडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
पानसरेंनी शिवाजी कोण होता? लिहिले म्हणून हत्या! कुटुंबीयांचा हायकोर्टात दावा

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिले होते. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा पानसरे कुटुंबीयांतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच अतिरिक्त माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले. याची दखल घेतानाच न्यायालयाने एटीएसला चार आठवड्यांत संबंधित माहितीची पडताळणी करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब ठेवली.

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉ. पानसरे यांच्यावर कोल्हापुरात गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. कॉ. पानसरे, अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र गेल्या सात वर्षात प्रमुख आरोपीचा शोध न लागल्याने पानसरे यांच्या सून स्मिता पानसरे यांनी एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्त करत तपास एटीएसकडे वर्ग करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. त्यानुसार तपास राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वर्ग करण्यात आला.

त्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शाम चंडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी पानसरे कुटुंबीयांतर्फे ॲड. अभय नेवगी यांनी २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या शिवाजी कोण होता? या ७० पानी पुस्तकाचा संदर्भ दिला. या पुस्तकात कॉम्रेड पानसरे यांनी शिवाजी हिंदू राजा होता; मात्र हिंदू राष्ट्र बनवण्याची शिवाजीची कधीही इच्छा नव्हती, असे लिहिले होते. याच उल्लेखावरून पानसरेंची हत्या झाली, असा दावा ॲड. नेवगी यांनी केला. याची दखल खंडपीठाने संबंधित माहितीची पडताळणी करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in