राष्ट्रवादीचे पक्ष मुख्यालय आणि पक्षनिधी कोणाचा?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे मुंबईतील प्रदेश कार्यालय तसेच पक्षनिधी कोणाचा हा मुद्दा उपस्थित होणार आहे.
राष्ट्रवादीचे पक्ष मुख्यालय आणि पक्षनिधी कोणाचा?

प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे मुंबईतील प्रदेश कार्यालय तसेच पक्षनिधी कोणाचा हा मुद्दा उपस्थित होणार आहे. त्याबाबत अजित पवार यावर काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे मुंबईतील बलार्ड पिअर इस्टेट येथील प्रदेश कार्यालय तसेच पक्षाच्या निधीवर अजित पवार गट दावा सांगणार नाही. त्यामुळे हे पक्ष कार्यालय आणि पक्षनिधी शरद पवार गटाकडेच राहणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजुने निकाल देत, शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना बहाल केले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवन आणि शिवसेना पक्षाच्या निधीवर दावा सांगितला नव्हता. त्याच धर्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसही अजित पवारांच्या नावावर झाल्यानंतर पक्ष कार्यालय आणि पक्षनिधीचा मुद्दा उपस्थित होणार आहे. मात्र पक्ष कार्यालय आणि पक्षनिधीवर अजित पवार गट दावा सांगणार नसल्याचे समजते. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर प्रथमच पक्ष कार्यालयात आलेल्या अजित पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in