परभणीच्या जागेवरून महायुतीत बेबनाव! राष्ट्रवादीचे राजेश विटेकर लागले तयारीला, भाजपच्या बोर्डीकरांचाही दावा

परभणी लोकसभा मतदारसंघात संजय जाधव हे विद्यमान खासदार असल्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहे. मात्र,...
परभणीच्या जागेवरून महायुतीत बेबनाव! राष्ट्रवादीचे राजेश विटेकर लागले तयारीला, भाजपच्या बोर्डीकरांचाही दावा

विशेष प्रतिनिधी/मुंबई

परभणी लोकसभा मतदारसंघात संजय जाधव हे विद्यमान खासदार असल्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहे. मात्र, महायुतीत या जागेवरून जोरदार वाद सुरू असून, भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे या जागेवरून वाद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांनी अगोदरपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यात भाजपचे रामप्रसाद बोर्डीकरही या जागेसाठी सरसावले आहेत. याशिवाय माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचेही नाव चर्चेत आहे, तर शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर यांचेही नाव पुढे रेटले जात आहे. त्यामुळे जागा वाटपावरून वाद चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.

परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद मोठी आहे. त्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर मोजक्या मतांनी पराभूत झाले. त्यामुळे यावेळी त्यांनी अगोदरपासूनच लोकसंपर्क वाढवून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, जिल्ह्यात भाजपची ताकदही मोठी आहे. रामप्रसाद बोर्डीकर, त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांचे जिल्ह्यावर वर्चस्व आहे. त्यात जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे रामप्रसाद बोर्डीकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. बोर्डीकर यांनीही अगोदरपासूनच तयारी केलेली आहे. परंतु राष्ट्रवादीचा अजित पवार गट परभणीच्या जागेबाबत आग्रही आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. सहापैकी ३ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे महायुतीतील इतर पक्षाच्या तुलनेत भाजपची ताकद जास्त आहे. त्यासाठी परभणीतून महायुतीतर्फे भाजपचाच उमेदवार मैदानात उतरवावा, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी भाजपचे परभणी लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर या जागेसाठी आग्रही आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळाला पाहिजे, असे इच्छुक उमेदवार राजेश विटेकर यांचे म्हणणे आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आधीच तयारी सुरू केली. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपकडे १० जागांचा आग्रह धरला आहे. त्यात परभणीच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यामुळे भाजप परभणीची जागा राष्ट्रवादीला सोडेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिंदे गटाचीही मागणी

परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जातो. त्यामुळे शिवसेनेविरोधात शिवसेनेचाच उमेदवार देण्यात यावा, यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटानेही या जागेवर दावा सांगितला आहे. त्यासाठी त्यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकरांना मैदानात उतरविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीत सध्या रस्सीखेच सुरू आहे.

राष्ट्रवादीला जागा सुटण्याची शक्यता कमीच

परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हेच या जागेसाठी प्रमुख दावेदार मानले जातात. परंतु भाजप ही जागा सहजासहजी सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे येथे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव विरुद्ध भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. परंतु या तडजोडी कशा होतात, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in