ससून रुग्णालयातून पोलिसांना चकवा देऊन पसार झालेल्या ड्रग माफिया ललित पाटीलला तामिळनाडूच्या चेन्नईमधून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. ललित पाटीलला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. विरोधकांनी केलेल्या अरोपांनुसार ललित पाटीलला दिर्घकाळ रुग्णालयात ठेवण्याकरता आणि त्याला रुग्णालयातून फरार होण्याकरता राजकीय मंडळींनी मदत केली आहे. अटक केल्यानंतर आज त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात असताना मराठी वृत्तवाहिनीने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मोठा गौप्यस्फोट केला.
ललित पाटील हा २ ऑक्टोबर रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या रडावर होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांचं गुन्हे शाखा पथक त्याच्या मागावर होते. ललित पाटील चेन्नईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार चेन्नईतून त्याच्या मुसक्या आवळल्या. ललिल पाटीलच एन्काउंटर होणार असल्याची भीती त्याच्या आईवडिलांनी व्यक्त केली आहे. तसंच त्याला आज अंधेरी कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. त्यासर्व पार्श्वभूमीवर त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या गाडीत बसण्याआधी ललित पाटील म्हणाला की, मी लवकरच पत्रकारांशी बोलणार आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेत असताना, मी ससूनमधून पळून गेलो नाही. मला पळवलं गेलंय. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे. हे लवकरच सांगणार आहे, असं देखील तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने ललित पाटील कोणाची नावं घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ललित पाटील हा गेल्या नऊ महिन्यांपासून पुण्याच्या ससून रुग्णालयात होता. तो इकते दिवस रुग्णालयात का दाखल होता? तो रुग्णालयातून पळाला कसा? ससूनमधून पळाल्यानंतर तो कुठे लपून बसला होता. चेन्नईत तो कसा पळाला? चेन्नईतून तो कुठे जाणार होता? पळताताना त्याला कोणी कोणी मदत केली? ही सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. आता ललित पाटीलची चौकशी केल्यानंतर ही माहिती बाहेर येईल. मुंबई पोलीस या सर्व प्रकरणाची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद घेणार आहेत.