विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा उमेदवार पडणार? १२ उमेदवारांपैकी ११ जणांचा विजय निश्चित

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज, शुक्रवारी विधानसभेच्या आमदारांकडून विधिमंडळात मतदान होणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा उमेदवार पडणार? १२ उमेदवारांपैकी ११ जणांचा विजय निश्चित
Published on

मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी विधानसभेच्या आमदारांकडून विधिमंडळात मतदान होणार आहे. ११ जागा व १२ उमेदवार रिंगणात असल्याने एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. मात्र, हा पराभूत उमेदवार महायुतीचा की मविआचा, याचा फैसला शुक्रवारी रात्रीपर्यंत कळणार आहे.

आपला उमेदवार हमखास निवडून यावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतांचे गणित जुळवण्यावर भर दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. या दोघांपैकी कोण मते जास्त खेचतो त्यावर सारी गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे.

गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावल्याने १२ पैकी कोण पराभूत होणार याची राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत २३ मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातील. त्यामुळे आमदार त्यांची दुसरी आणि तिसरी पसंतीची मते कुणाला देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा धक्कादायक निकाल लागले आहेत.

शिवसेना शिंदे गटाकडे दोन उमेदवार निवडून आणण्याऐवढी पुरेशी मते आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित जुळविले आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याने पक्षाला तेवढी भीती नाही. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी कोण निवडून येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

आज चुरशीची निवडणूक

  • भाजप उमेदवार : पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत

  • शिवसेना (एकनाथ शिंदे) : भावना गवळी, कृपाल तुमाने.

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे.

  • काँग्रेस : डॉ. प्रज्ञा राजीव सातव,

  • शेतकरी कामगार पक्ष : जयंत पाटील

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : मिलिंद नार्वेकर

logo
marathi.freepressjournal.in