पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील सातारा, माढा, सांगली, हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांत आजपासून बरोबर तिसऱ्या दिवशी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा
Published on

रामभाऊ जगताप/ कराड

पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील सातारा, माढा, सांगली, हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांत आजपासून बरोबर तिसऱ्या दिवशी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या सर्व लोकसभा मतदारसंघातील प्रचार शेवटच्या टप्प्यात असून कोल्हापूर, कराडला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर वाईत ज्येष्ठ नेते खास. शरद पवार यांच्या सभांनी कार्यकर्त्यांना राजकीय चार्ज करण्यात आले. या मतदारसंघांतील वातावरणातील उन्हाच्या कडाक्यापेक्षा राजकारणातील एकमेकांवरील तडाके चांगलेच चर्चेचे विषय ठरत आहेत. उन्हाळ्याच्या गरमागरम वातावरणात रात्रीच्या वेळेत गावागावांत, चौकाचौकांत व पारांवर चर्चा रंगत असून प. महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार? हे येत्या ४ जून रोजीच्या मतमोजणी दिवशीच स्पष्ट होईल.

मात्र प. महाराष्ट्र हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असला तरी याठिकाणी महायुतीच्या तुल्यबळ उमेद्वारांसह नरेंद्र मोदी व अमित शहा या दिग्गजांच्या सभा पार पडल्यामुळे प्रत्येक ठिकाणी काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. एकीकडे याबाबत कट्ट्यांवर,परांवर चर्चा सुरू असतानाच काही ठिकाणी अगदी मुद्यांवरून गुद्यांवर येत हमरीतुमरी सुरू असल्याचेही ऐकायला मिळत आहे. साताऱ्यासह माढ्यात कोणाच्या अंगावर गुलाल पडेल अन् सांगली, हातकणंगले, कोल्हापुरात राजकीय वारे कोणाला खासदार करेल? कोल्हापुरात पाटील-महाडिक राजकीय वादात कोणत्या उमेदवाराला कोल्हापूरकर साथ देतील? यावरही जिल्ह्यात चर्चेच्या फैरी झडू लागल्या आहेत. साताऱ्यात छ. उदयनराजे भोसले यांना महायुतीने उमेदवारी दिली असली तरी त्यांच्या विरोधात माथाडी कामगार नेते व शरद पवार यांचे विश्वासू सरदार आ. शशिकांत शिंदे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी देऊन तुल्यबळ लढत उभी केली आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेतून 'मान गादिला मत तुतारी'ला अशी भावनिक सादही घातली जात आहे तर छ. उदयनराजे भोसले यांच्याकडून मुंबई एपीएमसी मार्केट कमिटीमधील कथित मुतारी घोटाळ्याचा मुद्दा चांगलाच प्रचार सभांमध्ये गाजत आहे.

साताऱ्यावर लक्ष अन् माढ्यावर चर्चा

सातारा जिल्हा माढा आणि सातारा या दोन मतदारसंघात विभागाला गेला आहे. माढ्यात महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आव्हान दिले आहे.ऐन उन्हाळ्यात माढ्यातील पाण्याचा प्रश्न पेटला आहे. यावरही सातारा, कराडसह जिल्ह्यातील मतदारांत चर्चा सुरू आहेत. कराडला छ. उदयनराजेंसाठी मोदींची सभा झाली. या सभेसाठी आलेल्या लोकांच्यातही साताऱ्यासह माढ्यात काय होईल या चर्चा सुरू आहेत.माढ्याला जोडलेल्या सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांची लढत आहे. पारावर बसलेले लोक माढा, सोलापुरात असलेल्या आपल्या पै-पाहुण्यांकडून यावर अंदाज घेत आहेत.

कोल्हापूर, हातकणंगले, सांगलीच्याही चर्चांना उधाण

वास्तविक लोकसभा निवडणुकीची एवढी उत्सुकता नसते मात्र,मोबाईल माध्यमामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यात बाहेर पडण्यापेक्षा भर दुपारी सावलीत बसून चर्चा केली जात आहे.या सावलीत साताऱ्याच्या राजकारणाची चर्चा संपली की कोल्हापूर,सांगलीच्या चर्चेला उधाण येत आहे,कोल्हापुरात शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यासाठी काँग्रेस नेते सतेज पाटील आणि भाजपचे धनंजय महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.या दोघांच्या राजकीय वादात नेमकी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हा सुद्धा तेथील लोकांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे.शेजारच्या सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या बंडखोरीने विद्यमान खास. संजय पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू ठेवला आहे,तर या दोघांच्या पारंपरिक संघर्षात मशाल चिन्ह घेऊन पै.चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपले राजकीय नशीब आजमावत आहेत,यावरही चर्चेला उधाण येत आहे. चर्चा आणि आकडेमोडीची गणिते सध्या पारावरच्या चर्चेत मुख्य कारण ठरत असली तरी केव्हा केव्हा कोठे तरी मुद्यांवर सुरू असलेली चर्चा प्रसंगी गुद्यांवरतीही येत असल्याचे दबक्या आवाजात का होईना पण ऐकावयास येत आहे. तरी पण या चर्चा असो की तर्कवितर्क असो याचा 'निकाल' ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणी दिवशी लागणार आहे, हे मात्र नक्की.

logo
marathi.freepressjournal.in