भुज'बळ' कुणाच्या पाठीशी? मशाल वा तुतारीचा पर्याय खुला, समता परिषदेचा वाढता दबाव?

लोकसभा, राज्यसभा निवडणुकीनंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेंनी जोर धरला असताना खुद्द छगन भुजबळांनी येवला व नाशिक येथे माध्यमांशी बोलताना माझ्या चेहऱ्यावर कुठे नाराजी दिसते का, मग मी नाराज कसा, असा उलट सवाल करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
संग्राहित छायाचित्र
संग्राहित छायाचित्र
Published on

हारून शेख/लासलगाव

लोकसभा, राज्यसभा निवडणुकीनंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेंनी जोर धरला असताना खुद्द छगन भुजबळांनी येवला व नाशिक येथे माध्यमांशी बोलताना माझ्या चेहऱ्यावर कुठे नाराजी दिसते का, मग मी नाराज कसा, असा उलट सवाल करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तथापि, छगन भुजबळ समर्थकांची नाराजी मुंबई येथे सोमवारी झालेल्या समता परिषदेच्या बैठकीनंतर स्पष्ट झाली आहे.

महायुतीला सोडचिठ्ठी देण्याचा भुजबळांनी विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात (स्वगृही) परत अथवा शिवसेना ठाकरे गट हे दोन प्रमुख पर्याय आहेत. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे भुजबळ काय निर्णय घेतात आणि आपल्यासोबत नाशिक जिल्ह्यासह किती समर्थक आमदार घेऊन जातात याकडेसुद्धा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी घ्यावी, असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आग्रह केल्याने स्पर्धेत नसलेल्या भुजबळांनी तब्बल महिनाभर नाशिक लोकसभा मतदारसंघात चाचपणी केली होती. भाजप-शिवसेना शिंदे गटातील इच्छुक उमेदवारांच्या रस्सीखेचीमुळे भुजबळांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी उमेदवारीवर पाणी सोडले. ती संधी हुकल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिलेल्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर वर्णी लागावी म्हणून त्यांच्या नावाची चर्चा असताना बारामती लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची वर्णी लागल्याने भुजबळांची तेथेही संधी हुकली. त्यामुळे भुजबळ समर्थक व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी वाढली. परिणामी, छगन भुजबळांनी महायुती सोडावी यासाठी दबाव वाढत आहे. अशातच मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची बैठक सोमवारी मुंबईच्या वांद्रे येथील एमईटी सेंटर येथे पार पडली. पाच तास चाललेल्या या बैठकीत समता परिषदेच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यानी छगन भुजबळ यांच्याकडे वेगळा निर्णय घ्या, अशी मागणी केली असल्याचे समजते. आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यानी बोलून दाखवली. साहेब तुम्ही विचार करा आणि निर्णय घ्या,आपल्यासाठी सर्वच ठीक नाही. त्यामुळे हीच ती वेळ आहे. अशी मागणीच समता परिषदेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यानी घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मंत्री छगन भुजबळ कोणता निर्णय घेतात, याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे.

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी स्वत: अमित शहा यांनी छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी सुचवले असताना त्यावर शेवटपर्यंत एकमत होत नसल्याने भुजबळ यांना संतापून उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा करावी लागली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र त्यावेळी देखील छगन भुजबळ हे प्रचारात सक्रिय नव्हते. यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर नाशिक येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीला भुजबळ यांनी दांडी मारून येवला येथे कार्यक्रमाला हजेरी लावली. याबाबत शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने भावसार यांना उमेदवारी दिल्याचे सांगून वेळ मारून नेली. आज समता परिषदेच्या कार्यकर्त्यानी साहेब आता निर्णय घ्या असे म्हटल्याने भुजबळ यांच्या नाराजीला पृष्टी मिळत असून भुजबळ वेगळा निर्णय घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

मी नाराज नाही, कोणत्याही पक्षात जाणार नाही - भुजबळ

नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘मी नाराज नाही, तसेच कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. आमच्या विरोधी पक्षातील नेत्याला भेटलेलो नाही. त्यांना कधी भेटणार... मला वेळच नाही. माझ्या नाराजीच्या चर्चा फक्त प्रसारमाध्यमांनीच सुरू केल्या आहेत. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. कायमच राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहीन. प्रसारमाध्यमांकडे सध्या दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे भुजबळांच्या बातम्या दाखवल्या जात आहेत.’

logo
marathi.freepressjournal.in