मुंबईतील मराठी माणूस बाहेर का फेकला गेला?मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी पैठणमधील सभेत आव्हान दिले
मुंबईतील मराठी माणूस बाहेर का फेकला गेला?मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
Published on

“शिवसेनेला मराठी माणसाचा एवढाच पुळका होता, तर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील मराठी माणूस बाहेर का फेकला गेला, या प्रश्नाचे उत्तर द्या. हिंमत असेल तर दैनिक‘सामना’तून आजघडीला मुंबईत किती मराठी माणसे उरलीत, याची आकडेवारी जाहीर करा,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी पैठणमधील सभेत आव्हान दिले.

सामनातील ‘रोखठोक’सदरातून आमच्यावर सतत टीका केली जाते; पण त्याच सदरातून मुंबईतील मराठी माणसाच्या सद्य:परिस्थितीवर भाष्य केले जावे. तुमची सत्ता असताना मुंबईतून मराठी माणूस का बाहेर फेकला गेला? मराठी माणसाला वांगणी, बदलापूर, विरारला का जावे लागले, याचे विश्लेषण करा, असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत एकप्रकारे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. शिंदे यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या दुरवस्थेसाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनाच कशी जबाबदार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. “शिवसेना केवळ निवडणूक आली की, मराठीचा मुद्दा पुढे आणते. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचा डाव असल्याचे सांगितले जाते; पण हे सगळं फक्त निवडणुकीपुरतेच बोलले जाते. निवडणूक संपली की, मराठी माणूस देशोधडील का लागला, मुंबईतील मराठी टक्का कमी का झाला, याकडे कोणीही लक्ष देत नाही. आता तुम्ही ज्याप्रकारे मुलुंड, भांडूप, दादर आणि परळ भागातील घराघरांमध्ये जात आहात, तसे पूर्वी गेले असता तर मुंबईतील मराठी टक्का कमी झाला नसता; मात्र आधी मराठी माणसांचा वापर करायचा आणि नंतर खापर दुसऱ्यांवर फोडायचे, ही तुमची रणनीती आमच्या लक्षात आली आहे,” असे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट प्रहार करताना स्वत:चाच पक्ष असलेल्या शिवसेनेवर खापर फोडले.

“एकनाथ शिंदे हे हा केवळ बुडबडा आणणारा साबण आहे, असे म्हटले जाते; पण याच साबणाने तुमची धुलाई केली आहे, हे लक्षात असू द्या,” असा टोलाही शिंदे यांनी शिवसेनेला हाणला. “याकूब मेमन देशद्रोही होता त्याच्या कब्रस्तानाचे उदात्तीकरण मविआने केले. मेमनचे हस्तक होण्यापेक्षा ‘कलम ३७०’सोबत चांगले निर्णय घेतलेल्यांचे सहकारी व्हायला काय हरकत आहे,” असा सवालही त्यांनी केला.

पैठणमध्ये सभेच्या व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेव दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयो मंत्री संदीपान भुमरेंसह दिग्गजांची उपस्थिती होती. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे हे दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे आणि शिवसेनेत वाद होत आहेत. अनेक ठिकाणी तर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याच्या घटनादेखील घडल्या. या पार्श्वभूमीवर पैठणमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in