विधवा ऐवजी गंगा भागिरथी उल्लेख करा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रस्ताव

चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली
विधवा ऐवजी गंगा भागिरथी उल्लेख करा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रस्ताव

दिव्यांग बांधवांचा मानाने उल्लेख करण्यात येत आहे. आता विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांना विधवा ऐवजी गंगा भागिरथी हा शब्द वापरावा, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन चर्चा करण्याची सूचना राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव यांना दिल्या आहेत. याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

समाजातील उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग बांधवांचा उल्लेख दिव्यांग करण्याची संकल्पना राबवून दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजाविली. हीच बाब लक्षात घेता राज्यातील विधवा महिलांना सन्मान देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहले आहे. या पत्रात विधवा हा शब्द वापरण्याऐवजी गंगा भागिरथी हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन त्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

याबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या फक्त प्रस्ताव तयार करुन त्यावर चर्चा करण्याची सूचना करण्यात प्रधान सचिवांना करण्यात आली आहे. चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in