भाजप आता तरी सुधारणार का? उद्धव ठाकरे यांचा सवाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कान टोचल्यानंतर तसेच संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’च्या टीकेनंतर भाजप आता तरी सुधारणार आहे का? काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन हल्ले झाले, ‘अब की बार’वाले आता कुठे गेले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला व भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
Uddhav Thackeray
Published on

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कान टोचल्यानंतर तसेच संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’च्या टीकेनंतर भाजप आता तरी सुधारणार आहे का? काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन हल्ले झाले, ‘अब की बार’वाले आता कुठे गेले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला व भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर आता महाविकास आघाडीतील पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी देखील विधानसभेसाठी आतापासूनच कंबर कसली असून राज्यातील २८८ मतदारसंघांचा अहवाल ठाकरेंनी आपल्या संपर्कप्रमुखांकडून मागविला आहे. कोणत्या मतदारसंघात आपल्या उमेदवाराला आघाडी आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मित्रपक्षाच्या तसेच मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी काम केले का? कोणाचा उमेदवार दिला तर विजयाची शक्यता आहे, आदी मुद्द्यांवर हा अहवाल तयार होणार असल्याचे समजते.

‘ऑर्गनायझर’मधून भाजपला खडेबोल सुनावण्यात आले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यथा व्यक्त केल्यानंतर तरी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा मणिपूरमध्ये जाणार आहेत का, असा सवालही ठाकरे यांनी केला.

मोहन भागवत एक वर्षानंतर का होईना मणिपूरबद्दल बोलले. भागवतांचे बोल तरी पंतप्रधान मोदी आता गंभीरपणे घेऊन मणिपूरला भेट देणार आहेत का? ३७० कलम हटवून काश्मीरमध्ये काय फरक पडला. तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले हे सांगण्यात मोदी व्यस्त आहेत. मात्र, तिकडे सुरक्षा दलांवर हल्ले होत आहेत. आता तरी तुम्ही लक्ष देणार आहात का, अशी विचारणा त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासमोरील संकटांना संपवणार आहेत की, आपल्या प्रतिपक्षांना संपवण्याच्या मागे लागणार आहेत. देशातील नागरिकांचे प्रश्न लोकसभेत व विधानसभेत मांडणाऱ्या विरोधी पक्षांना संपवण्याच्या मागे मोदी लागणार असतील तर हे सरकार कुचकामी आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in