‘एमआयडीसी’साठी संपादित जमीन मोबदल्याची संपूर्ण चौकशी करणार;मंत्री उदय सामंत यांची माहिती

या जमिनीचा मोबदला मिळण्यासंदर्भात सदस्या डॉ.मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
‘एमआयडीसी’साठी संपादित जमीन मोबदल्याची संपूर्ण चौकशी करणार;मंत्री उदय सामंत यांची माहिती

नागपूर : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (पश्चिम) येथील मौजे जांभिवलीमधील एकूण ५८ एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केलेली असून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळण्यासंदर्भात संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. या जमिनीचा मोबदला मिळण्यासंदर्भात सदस्या डॉ.मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

सामंत म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी ही जमीन संपादित केलेली आहे. त्याचा मोबदला देण्यात आलेला असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, मोबदला शेतकऱ्यांना का मिळाला नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात येईल. तसेच राज्यातील काही औद्योगिक विकास महामंडळाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदल्याच्या बाबतीत समस्या आहेत. त्यासुद्धा दूर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

औद्योगिक विकास महामंडळ, ठाणे व उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर यांच्याकडून मिळकतीबाबतचा निवाडा, कब्जे पावती, संयुक्त मोजणी पत्रकांचा अहवाल देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असेल, तर माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, सचिन अहीर, आमश्या पाडवी यांनी सहभाग घेतला.

logo
marathi.freepressjournal.in