छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयी- सुविधा उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. 'चिठ्ठीमुक्त घाटी' या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी भेट देऊन अतिविशेषोपचार रुग्णालयाची पाहणी केली आणि डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ.अजय चंदनवाले, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे उपस्थित उपस्थित होते.
तुम्ही सगळे डॉक्टर सामान्यांसाठी विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडतात. अडीच वर्षांपूर्वी आमचं सरकार आले तेव्हापासून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून निर्णय घेत आलो आहोत. आरोग्याच्या क्षेत्रातही सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेतले आहेत. राज्यातील सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर आमचा भर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांना ५ हजार रुपये दरमहा सुधारित मानधन देण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आल्याचे ते म्हणाले.
सद्यस्थितीमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये बाहयरुग्ण विभाग, कक्ष, आय.सी.यु. शस्त्रक्रियागृहे इत्यादी सेवा युरॉलॉजी, न्युरोसर्जरी, कार्डियॉलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, अशा प्रकराच्या अतिविशेषोपचार सेवा सुरु केलेल्या आहेत. यासेवेचा लाभ मराठवाडयासह बुलढाणा, वाशिम, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर अशा एकूण १४ जिल्ह्यामधून येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांना फायदा होत आहे.