पुणे : मराठा आरक्षणासाठी पुण्यात रविवारी जनजागृती आणि शांतता रॅलीला सहा तासांच्या विलंबाने सुरुवात झाली. यावेळीही मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. फडणवीस आरक्षणाचे आश्वासन देतात, मात्र आरक्षण देत नाहीत. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात असलेल्यांची नावे सांगा. आता आरक्षण दिले नाही तर आम्हाला फडणवीस यांच्याशी भांडण करावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
पुण्यातील रॅलीदरम्यान ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून जरांगे यांचे बॅनर झळकत होते. या सभेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते.
“देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचे छगन भुजबळ आणि इतर नेते माझ्याविरोधात आणि मराठ्यांच्या अंगावर सोडले आहेत. जे कोण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. काही झाले तरी फडणवीस यांना समाजाला उत्तर तर द्यावेच लागेल. त्यामुळे फडणवीस यांना एकच विनंती आहे की, त्यांनी मराठा समाजाच्या अंगावर येऊ नये. मराठा समाज त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही सरळ आरक्षण देणार नसाल तर तुमच्याशी भांडणच करावे लागेल. सरकार ऐकण्याच्या मन:स्थितीत आहे.