नांदेडात सहानुभूतीच्या लाटेत मोदींची जादू चालणार का? ९ विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणुकीचे रण तापले

Maharashtra assembly elections 2024 : नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसोबतच लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. या अनुषंगाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.
नांदेडात सहानुभूतीच्या लाटेत मोदींची जादू चालणार का? ९ विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणुकीचे रण तापले
Published on

भास्कर जामकर/नांदेड

नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसोबतच लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. या अनुषंगाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या घरोघरी भेटींसोबतच कॉर्नर बैठक, वेगवेगळ्या समाजाचे मेळावे, सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यावर राजकीय पक्षांकडून भर दिला जात आहे. दरम्यान, महायुतीकडून नऊ विधानसभा व पोटनिवडणुकीसाठी शनिवारी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित जाहीर सभा झाली. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार की काँग्रेस आपली जागा राखणार? याचा फैसला दोन आठवड्यांनी होईल.

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध भाजपचे डॉ. संतुक हंबर्डे यांच्यात लढत होत असून दोन्ही उमेदवारांची ही पहिली निवडणूक आहे. दरम्यान, नांदेडमध्ये आतापर्यंत जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या, त्यात सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार की सहानुभूतीची लाट कायम राहणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे भाजपमधील स्थान मजबूत करण्याची एक संधी राहणार आहे.

नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघांत महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. यात नांदेड उत्तर व नांदेड (दक्षिण) मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांविरुद्ध भाजपच्या मिलिंद देशमुख व दिलीप कंदकुर्ते या प्रमुख पदाधिकार्‍यांनीच बंडखोरी केली आहे. तसेच मुखेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सचिव राहिलेल्या बालाजी खतगावकर यांनी भाजप आमदार डॉ. तुषार राठोड यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे. तर, किनवट मतदारसंघात भाजप आमदार भीमराव केराम यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक यांनी अर्ज कायम ठेवला आहे.

नांदेड उत्तर मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याचे दिसते. तेथे अब्दुल सत्तार (काँग्रेस), बालाजी कल्याणकर (शिवसेना शिंदे गट ), संगीता पाटील डक (श‍िवसेना उबाठा), इंजि. प्रशांत इंगोले (वंचित बहुजन आघाडी), मिलींद देशमुख (अपक्ष) मैदानात आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघात त‍िरंगी लढतीचे चित्र असून मोहन हंबर्डे (काँग्रेस), आनंद तिडके पाटील (बोंडारकर) (शिवसेना शिंदे गट ), फारूक अहमद (वंच‍ित) व दिलीप कंदकुर्ते (अपक्ष) मैदानात आहेत. मुखेड मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. हनमंत पाटील बेटमोगरेकर (काँग्रेस), तुषार राठोड (भाजप), रावसाहेब पाटील ( वंचित) व बालाजी खतगावकर (अपक्ष) रिंगणात उतरले आहेत. किनवट मतदारसंघात चौरंगी लढत होणार असून, भिमराव केराम (भाजप), प्रदिप नाईक (राष्ट्रवादी श.प.), डॉ. कुंडलीक आमले (वंच‍ित), सचीन नाईक हे रिंगणात आहेत.

लोहा मतदारसंघात बहीण-भाऊ आमने - सामने

नांदेड जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी लढत भोकर मतदारसंघात होणार असली, तरी नायगावमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजेश संभाजी पवार यांच्याविरुद्ध खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय सामना लक्षवेधी होणार आहे. लोहा मतदारसंघात प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आशा शिंदे यांनी भाऊ प्रताप यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून एकनाथ पवार उमेदवार आहेत. या मतदारसंघात बहीण-भाऊ निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच समोरासमोर आहेत.

logo
marathi.freepressjournal.in